Naxalites Encounter in Chhattisgarh : लोकसभा निवडणूक अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. येत्या 19 एप्रिल रोजी देशभरात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. अशातच छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील कांकेरमध्ये पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यात तीन जवान जखमी झाले, तर अनेक नक्षलवादी ठार झाले आहेत.
एसपी कल्याण अलीसेला यांनी चकमकीत 18 नक्षलवादी ठार झाल्याची पुष्टी केली आहे. नक्षलवाद्यांचा टॉप कमांडर शंकर रावही मारला गेल्याचे त्यांनी सांगितले. शंकर राव याच्यावर 25 लाखांचा इनाम होता. घटनास्थळावरुन 7 AK47 रायफल, 1 INSAS रायफल आणि 3LMG देखील जप्त करण्यात आले. जखमी जवानांना जंगलातून बाहेर काढण्यासाठी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.
बीएसएफची नक्षलविरोधी कारवाईवृत्त संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सीमा सुरक्षा दल (बीएसएफ) आणि जिल्हा राखीव रक्षक (डीआरजी) यांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना छोटे बेथिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जंगलात गोळीबार सुरू झाला. गोळीबारात तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, तर अनेक नक्षलवादी ठार झाले.
राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये नक्षलवाद्यांचा प्रभावछत्तीसगड हे दुसऱ्या क्रमांकाचे नक्षलग्रस्त राज्य आहे. गृह मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, छत्तीसगडमधील बलरामपूर, बस्तर, बिजापूर, दंतेवाडा, धमतरी, गरिआबंद, कांकेर, कोंडागाव, महासमुंद, नारायणपूर, राजनांदगाव, सुकमा, कबीरधाम आणि मुंगेली हे 14 जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. आकडेवारीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचे हल्ले कमी होत नव्हते. तसे पाहिले तर राज्यात दरवर्षी सरासरी साडेतीनशेहून अधिक नक्षलवादी हल्ले होतात. यामध्ये दरवर्षी सरासरी 45 जवान शहीद होतात.
दुसऱ्या टप्प्यात निवडणुका कांकेरमध्ये 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. छत्तीसगडमधील रायपूर आणि जगदलपूर दरम्यान असलेल्या कांकेर लोकसभा मतदारसंघात विधानसभेच्या 8 जागांचा समावेश आहे, त्यापैकी सहा अनुसूचित जमातींसाठी राखीव आहेत. या विधानसभा जागांमध्ये गुंडेरदेही, संजरी बालोड, सिहावा (ST), दोंडी लोहारा (ST), अंतागड (ST), भानुप्रतापपूर (ST), कांकेर (ST) आणि केशकल (ST) यांचा समावेश आहे. मूळचा बस्तर जिल्ह्याचा भाग असलेला कांकेर 1998 मध्ये वेगळा जिल्हा बनला.