नवी दिल्ली : देशातील नक्षलग्रस्त क्षेत्रात सुरू करण्यात आलेल्या विविध विकास योजनांचा आढावा घेण्याकरिता शुक्रवारी सात नक्षलग्रस्त राज्यांचे मुख्य सचिव आणि केंद्रीय मंत्रालयांमधील सचिवांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय गृहसचिव राजीव महर्षी यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीला, महाराष्ट्र, झारखंड, बिहार, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगणाचे मुख्य सचिव उपस्थित राहतील. अधिकृत प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने एक बहुआयामी रणनीती तयार केली असून, या अंतर्गत सुरक्षेसंबंधी उपाययोजना, विकासात्मक कार्यक्रम, स्थानिक समुदायांचे अधिकार आणि उत्थानाला प्राधान्य देण्यात आले आहे. रस्तेनिर्मिती, मोबाइल टॉवर लावणे आणि मजबूत ठाण्यांची निर्मिती यांसारख्या विशेष प्रकल्पांना केंद्राने मंजुरी दिली आहे. १०६ जिल्हे नक्षलग्रस्तदेशात १० राज्यांमधील १०६ जिल्हे नक्षलग्रस्त आहेत. यापैकी सात राज्यांच्या ३५ जिल्ह्यांमध्ये याची तीव्रता अधिक आहे. या वर्षीच्या पहिल्या चार महिन्यांत सुरक्षा दलांनी किमान ७६ नक्षल्यांना ठार, तर ६६५ जणांना अटक केली. (वृत्तसंस्था)नवादा : बिहारच्या नवादा जिल्ह्यातील रजौली पोलीस स्टेशनअंतर्गत सपही गावात शारदा माईका माईन्स परिसरात गुरुवारी पोलिसांनी नक्षलविरोधी अभियानांतर्गत १५ लोकांना अटक करून १० रायफली आणि ५० काडतुसे जप्त केले. पोलीस अधीक्षक विकास वर्मन यांनी ही माहिती दिली.
नक्षल्यांनी पेरलेले टिफीन बॉम्ब जप्तरायपूर : छत्तीसगडच्या धमतरी जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पेरलेले दोन टिफीन बॉम्ब जप्त करण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली. सुरक्षा जवानांचा घातपात करण्याकरिता हे बॉम्ब पेरून ठेवण्यात आले होते. यापैकी एक दोन किलो वजनाचा आयईडी बोरईमधील घनदाट जंगलात बुधवारी सापडला, तर दुसरा कट्टी आणि सैगुडा खेडेगावादरम्यान जप्त करण्यात आला. क्षेत्रात बॉम्ब पेरण्यात आल्याची गोपनीय सूचना मिळाल्यावर सुरक्षा जवानांनी शोधमोहीम हाती घेतली होती.