लातेहार : तपासातून सुटका करून घेण्यासाठी झारखंडमध्ये नक्षलवादी जबरदस्तीने वृद्धांहाती नोटा बदलून घेत असल्याचे चित्र आहे. पाचशे आणि हजारच्या नोटा सध्या बदलून घेण्यात येत आहेत. लातेहार या जिल्ह्यात नक्षलवाद्यांचा मोठा प्रभाव आहे. या भागात नक्षलवाद्यांनी टॅक्स आणि खंडणीच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये वसूल केले आहेत. आपल्या खात्यात अडीच लाख रुपये जमा करण्यासाठी ते वृद्धांवर दबाव आणत आहेत. लातेहार जिल्ह्याचे अधीक्षक अनुप बरथरे यांनी सांगितले की, आम्हाला याबाबत माहिती मिळाली आहे. नक्षलवाद्यांकडून नोटा बदलण्यासाठी ग्रामस्थांचा उपयोग केला जात आहे. वृद्धांसोबत तरुण मुलांनाही हाताशी धरून ते नोटा बदलत असावेत. असे अवैध काम करणाऱ्या लोकांना पकडण्यासाठी पोलीस दोन दिवसांपासून शोध घेत आहेत. नक्षलवादी समर्थक स्थानिक लोक त्यांना मदत करीत असल्याचा संशय आहे. बिहारमधील काही नक्षलवाद्यांनी झारखंडमधील नक्षलवाद्यांसोबत एक बैठक आयोजित केली होती. या ठिकाणी आम्ही धाड टाकली; पण येथे प्रचंड धावपळ झाली. अनेक वाहनांची तपासणीही सुरू आहे. प्रत्येक हालचालींवर पोलीस लक्ष ठेवून असल्याचे पोलिसांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
वृद्धांमार्फत नक्षलवादी बदलत आहेत जुन्या नोटा
By admin | Published: November 17, 2016 2:36 AM