जगदलपूर - छत्तीसगडच्या जगदलपूर येथे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटायला आलेल्या आत्मसर्मपण केलेल्या नक्षलवाद्याने धक्कादायक खुलासे केले आहेत. जर एखादा नक्षलवाद्याला लग्न करायचं असेल तर त्याला आधी नसबंदी करावी लागते. माओवादी चळवळीत नसबंदी खूप सामान्य आहे. लग्नासाठी वरिष्ठ नेत्यांच्या आदेशानुसार ही प्रक्रिया पार पाडावी लागते असं विधान या नक्षलवाद्याने केले आहे.
तेलंगणात एका नक्षलवाद्याची लग्नाआधी नसबंदी केली होती. अनेक वर्षांनी जेव्हा त्याने सरेंडर केले तेव्हा नसबंदी प्रक्रिया पूर्वीसारखी करण्यासाठी आणखी एक सर्जरी करावी लागली. त्यानंतर तो एका मुलाचा बाप बनला. बहुतांश नक्षली सरेंडर केल्यानंतर पुन्हा कौटुंबिक जीवन जगण्यासाठी ही प्रक्रिया पार पाडतात. रविवारी अमित शाह यांच्यासमोर नक्षलीने हा खुलासा केला. तो म्हणाला की, जेव्हा मी सीपीआय (माओवादी) चा सदस्य होतो तेव्हा मला लग्नाआधी नसबंदी करावी लागली. परंतु जेव्हा सरेंडर करून मुख्य प्रवाहात परतलो तेव्हा मी आणखी एक ऑपरेशन वडील होण्यासाठी केले. दुसऱ्या ऑपरेशननंतर मी एका मुलाचा वडील झालो. नक्षली चळवळीतील नेत्यांना वाटतं की, मुले जन्माला आल्यानंतर त्यांचे सदस्य संसाराच्या मोहात अडकतील असं त्याने सांगितले.
त्याशिवाय या कौटुंबिक भावनेने नक्षलवादी आंदोलनाचं नुकसान होऊ शकतं. लग्न करणारे या आंदोलनापासून दूर होऊ शकतात. त्यामुळेच लग्नाआधी नक्षलवाद्याची नसबंदी केली जाते. नक्षली नेते कुठलाही सदस्य कौटुंबिक बंधनात अडकू नये यासाठी हे पाऊल उचलतात असं छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील आत्मसर्मपण केलेल्या एका नक्षलवाद्याने म्हटलं. हीच कहाणी ओडिशातील मलकानगिरी इथल्या माजी नक्षलवाद्याची आहे. त्याला महिला नक्षलवाद्याशी लग्न करण्यापूर्वी स्वत:ची नसबंदी करावी लागली असं समोर आले.
दरम्यान, युवक हिंसा सोडून शस्त्र हातातून फेकत आहेत त्याचं समाधान आहे. आत्मसर्मपण केलेल्या नक्षलवाद्याच्या पुर्नवसनाची जबाबदारी सरकारची आहे. नक्षलवादी चळवळीतील लोकांना माझं आवाहन आहे. तुम्ही समाजाच्या मुख्य प्रवाहात या. आम्ही तुमची जबाबदारी घेऊ असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.