Haryana Assembly Election Result 2024:हरयाणातील विधानसभा निवडणुकीचा आतापर्यंतचा कल किंवा निकाल पाहता भाजपला सरकार स्थापनेचा मार्ग स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, हरयाणात १२ ऑक्टोबरला भाजपचे नवे सरकार शपथ घेऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. १२ ऑक्टोबर या दिवशी विजयादशमी आहे. तसेच, निवडणूक निकालांवर मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी नायब सिंह सैनी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना विजयाचे श्रेय दिले.
नायब सिंह सैनी म्हणाले, "मला लाडवा आणि हरयाणातील २.८० कोटी जनतेचे आभार मानायचे आहेत. या विजयाचे श्रेय पंतप्रधान मोदींना जाते. हरयाणातील जनतेने पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर शिक्कामोर्तब केले आहे. हे सर्व केवळ पंतप्रधान मोदींमुळेच. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पुढे जात आहोत. त्यांनी माझ्याशी बोलून आशीर्वाद दिला. मला विश्वास आहे की हरयाणातील गरीब, शेतकरी, महिला आणि तरुण मला आशीर्वाद देतील. याच हिमतीने मी म्हणत होतो की, राज्यात भाजप तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल."
नायब सिंह सैनी हेच मुख्यमंत्री होतीलभाजपने पुन्हा एकदा नायब सिंह सैनीच मुख्यमंत्री होणार असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान, निवडणुकीपूर्वीच भाजपनं नायब सिंह सैनी यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित केलं होतं. हरयाणात ऐतिहासिक विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा सरकार स्थापन करून इतिहास रचणार असल्याचा विश्वास भाजपनं मंगळवारी व्यक्त केला.
लाडवा मतदारसंघातून नायब सिंह सैनी विजयीकुरुक्षेत्रातील लाडवा मतदारसंघातून मुख्यमंत्री नायब सिंह सैनी विजयी झाले आहेत. या जागेवर भाजप उमेदवार म्हणून असलेल्या नायब सिंह सैनी यांना एकूण ७० हजार १७७ मते मिळाली. त्यांनी १६ हजार ५४ मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. त्याचवेळी या जागेवर काँग्रेसचे उमेदवार मेवा सिंह दुसऱ्या स्थानावर राहिले. मेवा सिंह यांना एकूण ५४ हजार १२३ मते मिळाली, तर अपक्ष उमेदवार विक्रमजीत सिंह चीमा यांना एकूण ११ हजार १९१ मते मिळाली.
हरयाणातील कल किंवा निकालात भाजपला बहुमत दरम्यान, हरयाणातील विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी (8 ऑक्टोबर) जारी झालेल्या मतमोजणीच्या कलांमध्ये किंवा निकालांमध्ये भाजपनं बहुमताचा आकडा पार केला आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, राज्यातील ९० पैकी ५० जागांवर भाजप तर काँग्रेस ३५ जागांवर पुढे आहे.