Nayab Singh Saini: हरयाणात भाजपने विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत नायब सिंह सैनी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. हरयाणामध्ये गुरुवारी (17 ऑक्टोबर) नवीन सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे.
नायब सिंह सैनी यांची मुख्यमंत्री पदासाठी नियुक्ती केल्यामुळे पक्षाचे नेते अनिल विज आणि राव इंद्रजित सिंह हे नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. दोन्ही नेत्यांकडून अनेकदा मुख्यमंत्री होण्याचा दावा केला जात होता. यादरम्यान अमित शाह यांनी स्वतः लक्ष दिलं आणि निरीक्षक म्हणून अमित शाह हे विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत त्यांनी एकतेचा संदेश दिला.
अनिल विज यांनी मांडला होता प्रस्ताव विशेष म्हणजे,विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हरयाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह माजी गृहमंत्री अनिल विज यांनी पुढील मुख्यमंत्रीपदासाठी नायब सिंह सैनी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता.
नायब सिंह सैनी यांची प्रतिक्रियाविधीमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्यानंतर नायब सिंह सैनी यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले, हरयाणातील लोकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणांवर शिक्कामोर्तब केलं आहे. आजच राज्यपालांसमोर सरकार स्थापनेचा दावा करणार आहे. तसेच, २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनण्याचा संकल्प पुढे नेण्यासाठी हरयाणाच्या जनतेने वचन दिले आहे, असे नायब सिंह सैनी यांनी सांगितले.