पीडीपीची भूमिका : मेहबूबा मुफ्ती बुधवारी राज्यपालांना भेटणारश्रीनगर/नवी दिल्ली : जम्मू-काश्मिरात सरकार स्थापन करण्याबाबतची अनिश्चितता अद्याप कायम असतानाच, राज्यात स्थिर सरकार स्थापन करण्यासाठी नॅशनल कॉन्फरन्स व काँग्रेस या दोन पक्षांसोबत महाआघाडीची संकल्पना हा एक पर्याय असल्याचे पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीने (पीडीपी) म्हटले आहे.पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस मिळून महाआघाडी स्थापन करण्याचा विचार काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सर्वात आधी मांडला होता. दरम्यान, पीडीपी अध्यक्ष मेहबूबा मुफ्ती या बुधवारी राज्यपाल एन. एन. व्होरा यांची भेट घेऊन सरकार स्थापण्याबाबत चर्चा करणार आहेत. व्होरा यांनी गेल्या शुक्रवारी भाजपा आणि पीडीपी नेत्यांना चर्चेचे आमंत्रण दिले होते. निवडणूकपश्चात परिस्थितीवर मीडियाशी बोलू नका, असे स्पष्ट निर्देश नॅशनल कॉन्फरन्सचे कार्याध्यक्ष उमर अब्दुल्ला यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहेत. पीडीपीला सर्वात मोठा पक्ष या नात्याने सरकार स्थापन करण्याचा अधिकार आहे, असे नमूद करीत काँग्रेस पक्षाने रविवारी धर्मनिरपेक्ष सरकारच्या स्थापनेला आपला रचनात्मक पाठिंबा जाहीर केला. (वृत्तसंस्था)