Drugs Seized in Gujarat: गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यांवर अमली पदार्थांच्या तस्करीची प्रकरणे अनेकदा उघडकीस येतात. आता पुन्हा एका पोरबंदरच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. इराणीयन बोटींद्वारे अंमली पदार्थ आणल्याची माहिती दिल्ली एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे, दिल्ली एनसीबीने भारतीय नौदलाच्या सहकार्याने रात्री उशिरा ऑपरेशन केले, ज्यामध्ये 700 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले.
माहिती मिळताच दिल्ली एनसीबीने तत्काळ भारतीय नौदलाशी संपर्क साधला. या कारवाईत गुजरात एनसीबी आणि गुजरात एटीएसच्या पथकांचाही सहभाग होता. रात्री उशिरा करण्यात आलेल्या या कारवाईत समुद्राच्या मध्यभागी एक बोट अडवण्यात आली, त्यात मोठ्या प्रमाणात अमली पदार्थांची वाहतूक केली जात होती. या जप्तीची एकूण किंमत अद्याप उघड करण्यात आलेली नसून, ती कोट्यवधी रुपयांच्या आसपास असण्याची शक्यता आहे.
तब्बल 700 किलो ड्रग्ज जप्त करणे, हे एजन्सीचे मोठे यश मानले जात आहे. ही जप्ती म्हणजे तस्करांच्या नेटवर्कला मोठा धक्का तर आहेच, पण भारतीय एजन्सी तस्करीवर बारीक नजर ठेवत असल्याचेही सूचित करते. या प्रकरणी आठ ते दहा जणांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वीही एजन्सीने अशाप्रकारच्या अनेक कारवाया केल्या आहेत.