लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : गेल्या तीन वर्षांत देशात अमली पदार्थांच्या व्यवहारांत लक्षणीय वाढ झाली असून, या वाढत्या व्यवहारांना चाप लावण्यासाठी एनसीबीमध्ये (नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो) लवकरच १८०० नव्या अधिकाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. सध्या देशात एनसीबीचे अवघे ११०० अधिकारी असून, या भरतीमुळे अमली पदार्थ विरोधी कारवायांसाठी एनसीबीला मोठे बळ मिळणार आहे.
एनसीबीतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘नशामुक्त भारत’ मोहिमेसाठी केंद्र सरकारने आता कठोर पावले उचलली असून, याच अनुषंगाने एनसीबीमध्ये मनुष्यबळाची कमतरता असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला होता. तीन हजार नव्या अधिकाऱ्यांच्या भरतीचा प्रस्ताव एनसीबीने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिला; मात्र यापैकी १८०० अधिकाऱ्यांच्या भरतीला गृहमंत्रालयाने हिरवा कंदील दिला असून, आता केंद्रित वित्तमंत्रालयाच्या शिक्कामोर्तबाची औपचारिकता बाकी आहे. या भरतीमध्ये उपसंचालक आणि सहायक संचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांचीही भरती होणार आहे.
देशातील अंमली पदार्थ व्यवहारांचा पॅटर्नही मोठ्या प्रमाणात बदलत असून, आजवर प्रामुख्याने अमली पदार्थांची तस्करी ही समुद्रकिनारी वसलेल्या शहरांतून होत असायची; मात्र आता अमली पदार्थांच्या व्यवहाराने अजमेर, अमृतसर, भुवनेश्वर, देहरादून, गोवा, हैदराबाद, मदुराई, मंडी, रायपूर, रांची, कोची अशा प्रथम व द्वितीय श्रेणी शहरांतूनही आपले हातपाय मोठ्या प्रमाणावर पसरले आहेत. याला पायबंद घालण्यासाठी प्रामुख्याने या अधिकाऱ्यांच्या नेमणुका होणार असल्याचे समजते.
तीन वर्षांत १८८१ कोटींचे अमली पदार्थ २०१८ ते २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत देशभरात सुमारे १८८१ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. या छाप्यांत ३५ लाख किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत.