NCB Sameer Wankhede : आर्यन खान ड्रग्स प्रकरणी (Aryan Khan Drug Case) तपास करणारे एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede NCB) हे सोमवारी दिल्लीत दाखल झाले. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. किरण गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं आणि ऐकल्याचं साईल यांचा दावा आहे. या आरोपांमुळे समीर वानखेडे यांची चौकशी केली जाणार आहे. दिल्लीला पोहोचल्यानंतर वानखेडे यांनी आपल्याला समन बजावण्यात आला नसल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलं.
माध्यमांशी बोलताना वानखेडे यांनी २५ कोटी रूपयांच्या डीलच्या प्रकरणाचं खंडन करत हे आरोप निराधार असल्याचं म्हटलं. तसंच आपल्याला जे काही प्रश्न विचारले जातील त्याचं आपण उत्तर देऊ, असंही ते म्हणाले. "मला समन देण्यात आलेलं नाही. मी या ठिकाणी एका वेगळ्या कामासाठी आलो आहे. माझ्या विरोधात करण्यात आलेले आरोप निराधार आहेत," असं वानखेडे यांनी स्पष्ट केलं.