पुणे : राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील शास्त्रज्ञांनी स्मार्टफोन, एलसीडी टीव्ही संचासारख्या उपकरणांमध्ये वापर होत असलेल्या चांदीच्या नॅनो (सुक्ष्म) तारेची निर्मिती करण्यात यश मिळविले आहे. जागतिक बाजारपेठेत अत्यंत महागडी असलेली ही तार तब्बल बारा पटीने स्वस्तात उफलब्ध होऊ शकणार आहे. या तारेची उत्पादन सुरू करण्यात आले आहे.वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. शेखर मांडे यांच्या हस्ते या तारेची प्रायोगित तत्वावर निर्मिती करणाऱ्या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. हा प्रकल्प ‘एनसीएल’मध्येच उभारण्यात आला आहे. संस्थेतील शास्त्रज्ञ डॉ. अमोल कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली प्राची काटे, सुनेहा पाटील, डॉ. बी. एल. व्ही प्रसाद आणि डॉ. नंदिनी देवी यांचा हे तंत्रज्ञान विकसित करण्यात मोलाचा वाटा राहिला आहे. मागील चार वर्षांपासून हे संशोधन सुरू होते. सद्यस्थितीत या तारेची निर्मिती करणारे ९९ टक्क्यांहून अधिक उत्पादक भारताबाहेरील आहेत. इलेक्ट्रॉनिक उत्पादनांमध्ये वापरण्यात येणारी बहुतेक सुक्ष्म साहित्य भारताला आयात करावे लागते. स्मार्ट फोन, एलसीडी टीव्ही, लॅपटॉप यामध्ये वापरण्यात येणारे टच स्क्रीनसाठीचे सर्कीट तसेच इतर जोडण्यांमध्येही या सुक्ष्म तारेचा वापर केला जातो. भारतामध्ये या उपकरणांची केवळ जोडणी केली जाते. मात्र, सर्व सुट्टे भाग परदेशातून भारतात येतात. सुक्ष्म तारेच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्या जगात केवळ ६-७ असून त्यातही तीनच कंपन्यांची मक्तेदारी आहे. त्यामुळे या तारेची किंमत खुप अधिक आहे. जागतिक बाजारपेठेत ही तारेसाठी प्रति ग्रॅम ३० हजार रुपये मोजावे लागतात. ‘एनसीएल’मध्ये तयार होत असलेल्या तारेचा उत्पादन खर्च केवळ २ हजार रुपये एवढाच आहे. भारतामध्ये या तारेचा वापर करून उपकरणे बनविणाऱ्या कंपन्या नाहीत. त्यामुळे ‘एनसीएल’मध्ये सध्या अत्यंत मर्यादीत स्वरूपात उत्पादन केले जात आहे. दररोज ५०० ग्रॅम उत्पादन क्षमता असली तरी मागणीअभावी हे उत्पादन कमी होते. या तारेची निर्यात करण्यासाठी काही कंपन्यांशी करार करण्यात आला आहे. त्यांच्यामार्फत मोबाईल, टीव्ही, लॅपटॉपसह अन्य इलेक्टॉनिक तसेच तारेचा उपयोग होणाºया क्षेत्रातील कंपन्यांना पुरवठा केला जाईल, अशी माहिती डॉ. कुलकर्णी यांनी दिली.------------ऱ्या
जागतिक बाजारपेठेत अत्यंत महागड्या चांदीच्या नॅनो तारेवर‘एनसीएल’ची चमक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2020 1:51 PM
सुक्ष्म तारेच्या निर्मिती करणाऱ्या कंपन्या जगात केवळ ६-७ असून त्यातही तीनच कंपन्यांची मक्तेदारी
ठळक मुद्देसद्यस्थितीत या तारेची निर्मिती करणारे ९९ टक्क्यांहून अधिक उत्पादक भारताबाहेरील भारतामध्ये या तारेचा वापर करून उपकरणे बनविणाऱ्या कंपन्या नाहीतदररोज ५०० ग्रॅम उत्पादन क्षमता असली तरी मागणीअभावी हे उत्पादन होते कमी