अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 13:03 IST2024-06-03T13:01:54+5:302024-06-03T13:03:13+5:30
NCP DCM Ajit Pawar News: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावले पुढे पडत असून, अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश; अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
NCP DCM Ajit Pawar News: एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी अवघे काही तास राहिले असताना दुसरीकडे अरुणाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांचे निकाल आले. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसअजित पवार गटाचे तीन आमदार निवडून आले. यानंतर आता पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी या आमदारांच्या विजयाबाबत आनंद व्यक्त करत प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांच्या राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत एकूण १५ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी तीन उमेदवार निवडून आले आहेत. तर एका उमेदवाराचा दोन मतांनी पराभव झाला, तर दुसरा उमेदवार २०० मतांनी पराभूत झाला. अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाचे ४६ आमदार निवडून आले आहेत. राष्ट्रवादीने अरुणाचल प्रदेशमध्ये यश मिळाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली.
अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम फळास आले
अरुणाचल प्रदेश येथे पार पडलेल्या विधानसभा निवडणूक २०२४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ३ उमेदवार निवडून आल्याबद्दल तिन्ही उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो. हा विजय ऐतिहासिक असून, या निवडणुकीत अरुणाचल प्रदेशमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी घेतलेले अथक परिश्रम फळास आले आहेत. त्यामुळे त्यांचे देखील अभिनंदन करतो. विशेष बाब म्हणजे एकूण मतांच्या १०.०६ टक्के मते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदरात पडली, याचा फार आनंद आहे. अरुणाचल प्रदेशच्या मतदारराजाने आमच्या पक्षाच्या उमेदवारांवर दाखवलेला विश्वास हीच आमची ताकद असून, याच ताकदीच्या जोरावर यापुढे विकासाची गंगा अरुणाचल प्रदेशमध्ये वाहेल असा शब्द देतो, असे अजित पवार यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विकासाची पावले पुढे पडत आहेत. अरुणाचल प्रदेशमधील यश हे पक्षाच्या प्रगतीचे द्योतक आहे. लोकशाहीची मुल्ये अंगीकारून आमचा पक्ष देशभर विकासाचे नवनवे आदर्श उभे करेल यात काही शंका नाही. देशाच्या सामाजिक व आर्थिक विकासाला चालना देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत, असा शब्द अजित पवारांनी दिला.