नवी दिल्ली: राष्ट्रवादीच सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची दिल्लीत भेट घेतली. या दोघांमध्ये २० ते २५ मिनिटे वन-टू-वन चर्चा झाली. मात्र, पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांच्यात नेमक्या कोणत्या विषयावर चर्चा झाली, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. मात्र, खुद्द शरद पवार यांनीच पत्रकार परिषद घेऊन भेटीमागील कारण स्पष्ट केले.
पंतप्रधान मोदींना मी एकटा भेटलेलो नाही. आमचे लक्षद्वीपचे खासदार मोहम्मद फैजल पी. पी. देखील भेटीवेळी उपस्थित होते. त्यांनी पंतप्रधानांसमोर लक्षद्वीपमध्ये नागरिकांचा प्रशासकाविरोधात सुरू असलेल्या रोषाची माहिती दिली. मी फक्त सोबत उपस्थित होतो. तसेच मीही दोन मुद्द्यांवर पंतप्रधान मोदींचे लक्ष वेधले. यात महाराष्ट्रात गेल्या अडीच वर्षांपासून राज्यपाल नियुक्त १२ आमदारांचा प्रश्नाबाबत त्यांच्याशी बोललो आहे. अजूनही त्या आमदारांची नियुक्ती झालेली नाही हे त्यांच्या लक्षात आणून दिले. तर दुसरे म्हणजे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्यावर झालेल्या कारवाईचीही माहिती पंतप्रधानांना दिली, असे शरद पवार यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय तपास यंत्रणा मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत, त्यामुळे तुम्ही पंतप्रधान मोदींना भेटलात का, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला.
शरद पवार हसले अन् म्हणाले...
गेल्या महिन्यात आयकर विभाग थेट ‘मातोश्री’पर्यंत पोहोचला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची संपत्ती आयकर विभागाकडून जप्त करण्यात आली. तसेच शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबाग आणि मुंबईतील संपत्ती ईडीने जप्त केली. यानंतर आता महाविकास आघाडी आणि भाजपमधील वाद शिगेला पोहोचल्याचे पाहायला मिळत आहे. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने याच संदर्भात प्रश्न विचारला. केंद्रीय तपास यंत्रणा आता थेट मातोश्रीपर्यंत जाऊन पोहोचल्या आहेत, त्यामुळेच तुम्ही पंतप्रधान मोदींची भेट घेतली का, असा प्रश्न विचारण्यात आला. यावर शरद पवार यांनी स्मितहास्य करत नकारार्थी उत्तर दिले. संजय राऊत यांच्यावर अन्याय झाल्याची कल्पना पंतप्रधान मोदींना दिली, असे शरद पवार यांनी सांगितले.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर भाजपसोबत जाणार का, असेही पवारांना विचारण्यात आले. यावर, आम्ही कधीच भाजपसोबत नव्हतो आणि भाजपविरोधी पर्याय द्यायचा असे आमचे ठरले आहे. महाविकास आघाडी सरकार भाजपविरोधात उभी आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच नाही. भाजपविरोधात पर्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. सरकार ५ वर्ष पूर्ण करेल आणि पुढील विधानसभा निवडणुकीतही महाविकास आघाडीच निवडून येईल, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.