नवी दिल्ली: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज (मंगळवारी) काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी दिल्लीतील १०, जनपथ येथील निवासस्थानी भेट घेतली आहे. काही मतदारसंघाबाबत दोन्ही पक्षात मतभेद आहेत. तसेच आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील आघाडी संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तसेच आघाडी पक्षाच्या नेत्यांमध्ये जागा वाटपावरुन बैठक्या सुरु असून यामध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित केले असून जवळपास २२५ जागांवर दोन्ही पक्षांचे एकमत झाले आहे. मात्र अजूनही इंदापूरच्या जागेसह २५ ते ३० जागांवर मतभेद असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या जागांबाबत प्रामुख्याने चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसला धक्क्यावर-धक्के बसत आहेत. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीचे अनेक नेते आणि आमदार एकापाठोपाठ शिवसेना किंवा भाजपामध्ये प्रवेश करत आहेत. अनेक जिल्ह्यातील महत्त्वाचे नेते भाजप आणि शिवसेनेच्या व्यासपीठावर दाखल झाल्याने निवडणुकी आधीच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष बँकफूटवर गेले आहेत.