NCP Sharad Pawar ( Marathi News ) : भाजप नेते आणि भारताचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न हा देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाला आहे. केंद्र सरकारकडून याबाबतची घोषणा झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांनीही या पुरस्कारासाठी अडवाणी यांची निवड योग्य असल्याचं सांगत त्यांचं अभिनंदन केलं आहे.
"भारतरत्न पुरस्कारासाठी कर्पुरी ठाकूर आणि लालकृष्ण अडवाणी या दोन व्यक्तींची झालेली निवड अतिशय योग्य आहे. कर्पुरी ठाकूर यांनी समाजातील दुबळ्या वर्गासाठी काम केलं. १९७८ साली मी महाराष्ट्रचा मुख्यमंत्री झालो, तेव्हा कर्पुरी ठाकूर हे बिहारचे मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये अनेकदा आमची चर्चा होत असत. अतिशय साधे आणि विनम्र, मात्र विचाराबाबत अत्यंत भक्कम असं त्यांचं व्यक्तिमत्त्व होतं. त्यामुळे त्यांची निवड ही योग्यच आहे. दुसरीकडे, लालकृष्ण अडवाणी हे अनेक वर्ष देशाच्या संसदेत होते. ते दिल्लीतून निवडूनही गेले होते. एखादा-दुसरा अपवाद सोडला तर त्यांचा कधी पराभव झाला नाही. सार्वजनिक जीवनात स्वच्छ चारित्र्याची व्यक्ती म्हणून त्यांचा लौकिक होता," अशा शब्दांत शरद पवार यांनी लालकृष्ण अडवाणी यांचं कौतुक केलं आहे.
भारतरत्न पुरस्काराबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन करत असताना शरद पवार यांनी त्यांच्यासोबत झालेल्या मतभेदांवरही भाष्य केलं. "आमच्यात आणि त्यांच्यात एका गोष्टीचे मतभेद झाले. अडवाणी यांनी रथयात्रा काढली आणि या यात्रेचा परिणाम म्हणून देशात काही न घडाव्यात अशा घटना घडल्या. तेवढा अपवाद सोडला तर अडवाणी यांचं सबंध जीवन हे भाजपचे नेते म्हणून, संसदेचे सदस्य म्हणून आणि केंद्रीय मंत्री म्हणूनही आदर्शवत होतं. त्यांच्या निवडीला उशीर झाला असला तरी ही अतिशय योग्य निवड आहे. त्यामुळे मी लालकृष्ण अडवाणी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांचं अभिनंदन करतो," असं पवार म्हणाले.
नरेंद्र मोदी काय म्हणाले?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतरत्न पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन केलं आहे. काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि थोर समाजवादी नेते कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर 'भारतरत्न' देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता अडवाणी यांनाही भारतरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. लालकृष्ण अडवाणी यांचं अभिनंदन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे की, "श्री. लालकृष्ण अडवाणी यांचा भारतरत्न पुरस्काराने सन्मान होत असल्याने मी खूप खूश आहे. मी त्यांच्याशी बोलून हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आहे. ते आपल्या काळातील सर्वाधिक आदर असणारे राजकीय नेते असून भारताच्या विकासात त्यांचं मोठं योगदान राहिलं आहे. तळागाळात काम करण्यापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास देशाच्या उपपंतप्रधान होण्यापर्यंत पोहोचला. त्यांनी देशाचे गृहमंत्री व माहिती आणि प्रसारण मंत्री म्हणूनही काम पाहिलं आहे. अडवाणी यांची संसदीय कारकीर्दही समृद्ध राहिलेली आहे," अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.