नवी दिल्ली: मुंबईतील १ हजार ०३४ कोटींच्या पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) चांगलेच अडचणीत आले आहेत. रविवारी सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत झालेल्या चौकशीनंतर अपेक्षित सहकार्य न करण्याच्या कारणावरून ईडीने संजय राऊत यांना मध्यरात्री अटक केली. संजय राऊतांवर ईडीने केलेल्या कारवाईनंतर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) दिल्लीत दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. यावेळी शरद पवार यांना संजय राऊतांवरील ईडी कारवाईबाबत प्रश्न विचारण्यात आले. मात्र, त्यावर अधिक बोलणे शरद पवार यांनी टाळल्याचे म्हटले जात आहे.
महाविकास आघाडीच्या शिल्पकारांपैकी एक असलेल्या संजय राऊत यांच्यावरील ईडी कारवाईनंतर महाराष्ट्राचे राजकारण प्रचंड तापले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमध्यमांनी शरद पवार यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. संजय राऊत यांना ईडीने अटक केली आहे. याबद्दल तुम्ही काय सांगाल, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला. त्यावर शरद पवार यांनी म्हटले की, मी काय सांगायचंय ते सांगितलेय, असे मोघम उत्तर शरद पवारांनी दिले. पण त्यानंतर पवार पुढे चालत राहिले आणि आपल्या गाडीत जाऊन बसले.
पवार पुन्हा एकदा राऊतांसाठी मोदींकडे शब्द टाकणार का
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी ईडीने संजय राऊत यांच्या मालमत्तांवर छापे टाकून त्या जप्त केल्या होत्या. तेव्हा शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींकडे केंद्रीय तपास यंत्रणांनी संजय राऊत यांच्यावर केलेल्या कारवाईबद्दल चिंता व्यक्त केली होती. यानंतर आता शरद पवार पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे शब्द टाकणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
कायद्याचे राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे
संजय राऊत वारंवार शिवसेनेची भूमिका मांडतात. स्पष्ट शब्दात ते विरोधकांना नामोहरम करतात. त्यामुळे त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. इथे कायद्याचे राज्य आहे आणि आमचा कायद्यावर विश्वास आहे, असे शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी म्हटले आहे. ईडी ही एक स्वायत्त संस्था आहे. या आधीही संजय राऊतांची चौकशी झाली. आता एक नवीन कारण शोधून पुढे आणले जातेय. केंद्रीय यंत्रणा ज्या कारवाई करतायत, त्या लोकशाहीला धरून नाही, असा आरोपही अनिल देसाई यांनी केला.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या माध्यमातून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार राज्यात कार्यरत होते. त्यावेळी विरोधकांच्या आरोपांचा राऊत सातत्याने समाचार घेत होते. त्यामुळे तपास यंत्रणांच्या माध्यमातून राऊत यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र, राऊत यांनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडली आहे, असे अनिल देसाई यांनी सांगितले.