नवी दिल्ली: कर्नाटकात सरकार स्थापनेचा फॉर्म्युला आता निश्चित झाला आहे. सिद्धरामय्या यांच्या हाती मुख्यमंत्रिपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. तर दुसरीकडे डीके शिवकुमार यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रं सोपवली जाणार आहेत. याशिवाय २०२४च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत डीके शिवकुमार प्रदेशाध्यक्ष म्हणून देखील कार्यरत राहणार आहे.
सिद्धरमैय्या यांचा मुख्यमंत्री म्हणून तर डीके शिवकुमार यांचा उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळा २० मे रोजी दुपारी १२.३० वाजता होणार आहे. त्यासाठी, देशातील काँग्रेसचे मुख्यमंत्री, वरिष्ठ पदाधिकारी, सर्वच राज्यांचे प्रदेशाध्यक्ष आणि गांधी कुटुंबीयांना निमंत्रण देण्यात येणार आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारकर्नाटक मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी फोन करुन शरद पवार यांना आमंत्रण दिले आहे.
अडीच वर्षांच्या फॉर्म्युलाच्या चर्चा
डीके शिवकुमार यांच्या निकटवर्तीयांचा दावा आहे की, दोन्ही नेत्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी प्रत्येकी अडीच वर्षे मिळतील, परंतु याला काँग्रेसच्या नेत्यांकडून अद्याप कोणताही दुजोरा मिळालेला नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावरील चर्चा २०२४च्या राष्ट्रीय निवडणुकांपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र, सिद्धरमय्या यांनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदाचा फॉर्म्युला पूर्णपणे फेटाळून लावला. याबाबत आपल्याला काहीही माहित नसल्याचं त्यांनी सांगितलं.
सोनिया गांधींचा हस्तक्षेप
कर्नाटकात मध्यरात्री उशिरा सरकार स्थापनेचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला. सोनिया गांधी यांच्या हस्तक्षेपानंतर कर्नाटकातील राजकीय संकट सुटलं आहे. शिवकुमार हे उपमुख्यमंत्रीपदासाठी तयार झाले आहे. तर सिद्धरामय्या कर्नाटकाचे नवे मुख्यमंत्री असतील.