राष्ट्रवादी कोणाची? आजपासून निवडणूक आयोगात सुनावणी; शरद पवार दिल्लीसाठी रवाना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2023 08:04 AM2023-11-20T08:04:21+5:302023-11-20T08:11:59+5:30

या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

ncp crisis hearing in election commission, sharad pawar vs ajit pawar maharashtra politics | राष्ट्रवादी कोणाची? आजपासून निवडणूक आयोगात सुनावणी; शरद पवार दिल्लीसाठी रवाना

राष्ट्रवादी कोणाची? आजपासून निवडणूक आयोगात सुनावणी; शरद पवार दिल्लीसाठी रवाना

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची? पक्षाचे नाव आणि चिन्ह कोणाचे? यासंदर्भात महत्त्वाची सुनावणी आज केंद्रीय निवडणूक आयोगात होणार आहे. दुपारी चार वाजता निवडणूक आयोगात ही सुनावणी पार पाडणार आहे. विशेष, म्हणजे पुढील तीन दिवस ही सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीत केंद्रीय निवडणूक आयोग दोन्ही गटांचे म्हणणे ऐकून घेईल. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नेमकी कोणाची? यासंदर्भात निर्णय देणार आहे. दरम्यान, या सुनावणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पुण्याहून दिल्लीसाठी रवाना झाले आहेत.

यापूर्वी २ नोव्हेंबर रोजी झालेल्या सुनावणीत शरद पवार यांच्या गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी बाजू मांडली होती. आता पुन्हा आजपासून सुनावणी सुरु होणार आहे. तसेच, दिल्लीत शरद पवार गटाची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीत रणनिती ठरवण्यात येण्याची शक्यता आहे. दरम्यान, निवडणूक आयोगापुढे २ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली. त्यात अभिषेक मनु सिंघवी यांनी दोन तास युक्तिवाद केला. त्यात अजित पवार गटाकडून खोटी प्रतिज्ञापत्र दाखल केली असल्याचा आरोप त्यांनी युक्तीवाद करताना केला. मृत्यू झालेल्या लोकांची प्रतिज्ञापत्रे दिली गेली. तसेच, अल्पवयीन मुलांची प्रतिज्ञापत्रे दाखल केल्याचा दावा अभिषेक मनु सिंघवी यांनी केला होता. 

याचबरोबर, गेल्या महिन्यात झालेल्या सुनावणीदरम्यान शरद पवार यांची अध्यक्षपदी झालेली नियुक्ती पक्षाच्या घटनेला धरून नसल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाने केला होता. निवडणूक आयोगात अजित पवार गटाकडून नीरज कौल आणि मणिंदर सिंग हे बाजू मांडत आहेत. तसेच, अजित पवार गटाकडून पी.ए. संगमा, सादिक अली या दोन्ही केसचा दाखला देण्यात आला होता. याशिवाय, शिवसेनेतील सत्ता संघर्षाच्या अनुषंगाने देण्यात आलेल्या निकालाचाही उल्लेख वारंवार केला होता. 

दरम्यान, अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यामुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. सत्तेत सामील झाल्यानंतर अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि घड्याळ चिन्हावर दावा केला आहे. अजित पवार गटाने पक्षावर दावा केल्यामुळे शरद पवार गटानेही आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे हे प्रकरण केंद्रीय निवडणूक आयोगात गेले आहे. या प्रकरणावर सुरू असलेल्या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रासह देशाचे लक्ष लागले आहे. 

Web Title: ncp crisis hearing in election commission, sharad pawar vs ajit pawar maharashtra politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.