रांची : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा दणदणीत पराभव झाला असून, भाजपाला 25 जागांवरच विजय मिळवता आला आहे. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने 47 जागांवर विजय मिळवत बहुमताचा आकडा पार केला आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने देखील एका जागेवर मुसंडी मारत झारखंड विधानसभेत खाते उघडले आहे.
झारखंड मुक्ती मोर्चाला 30 व काँग्रेसला 16 जागांवर यश मिळाले असून, राष्ट्रीय जनता दलाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. चार जागांवर अपक्ष व अन्य विजयी झाले आहेत. यामध्ये हुसैनाबाद मतदारसंघात चौरंगी लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार कमलेश कुमार सिंह 12 हजार 239 मतांनी विजयी झाले आहेत.
दरम्यान, भाजपाचे अध्यक्ष अमित शाह यांनी पराभव मान्य केल्या आहे. झारखंडच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा आदर करतो, असे ट्विट अमित शाह यांनी केले आहे. आपल्या ट्विटमध्ये अमित शाह म्हणतात की, ''आम्ही झारखंडच्या जनतेने दिलेल्या जनादेशाचा सन्मान करतो. भाजपाला पाच वर्षे राज्याची सेवा करण्याची जी संधी मतदारांनी दिली होती त्यासाठी आम्ही जनतेचे आभार मानतो. भाजपा राज्याच्या विकसासासाठी नेहमीच कटिबद्ध राहील. सर्व पक्ष कार्यकर्त्यांनी घेतलेल्या मेहनतीसाठी त्यांचे अभिनंदन असं म्हटलं आहे.