भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि मध्य प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री उमा भारती यांनी देशातील ब्युरोक्रसीवर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी ब्यूरोक्रसी म्हणजेच नोकरशाहीला चप्पल उचलणारे म्हटलं आहे. 'नोकरशाही म्हणजे काहीच नाही, ते आमच्या चपला उचलण्याचे काम करतात,' असं उमा भारती म्हणाल्या. त्यांच्या या वक्तव्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी टीका केली आहे. भाजप नेत्या उमा भारती यांचं वक्तव्य निषेधार्ह असल्याचं ते म्हणाले.
"भाजप नेत्या उमा भारती यांचं अधिकाऱ्यांबाबतचं वक्तव्य हे निषेधार्हच आहे. केंद्र सरकारकडून ED, CBI, IT या केंद्रीय संस्थांचा होणारा गैरवापर बघितला तर हेच वक्तव्य त्यांनी अधिकाऱ्यांबाबत न करता या संस्थांबाबत केलं असतं तर योग्य ठरलं असतं," असं म्हणत रोहित पवार यांनी उमा भारती यांनी निशाणा साधला. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून यावर निशाणा साधला.
आधी खाजगीत चर्चा केली जाते, नंतर नोकरशाह फाईल बनवून आणतात. आमच्या सांगण्याशिवाय ते काहीच काम करत नाहीत. आम्ही त्यांना पगार देतो, त्यांना पोस्टिंग देतो. आम्हीच त्यांच प्रमोशन आणि डिमोशन करतो. त्यांना कोणताही अधिकार नाही. ब्युरोक्रसीच्या बहाण्याने आम्हीच राजकारण करतो', असं वादग्रस्त वक्तव्यं त्यांनी केलं होतं.