Sharad Pawar On PM Narendra Modi : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे. "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रशासनावर चांगली पकड आहे आणि ही त्यांची मजबूत बाजू आहे," असं म्हणत शरद पवार यांनी मोदींचं कौतुक केलं. बुधवारी मुंबईत आयोजित एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.
कार्यक्रमादरम्यान बोलताना शरद पवार यांनी पंतप्रधानांच्या कार्यशैलीचे कौतुक केलं, तसंच मोदींनी एखादं काम हाती घेतलं तर ते काम पूर्ण करतातचं, असं पवार यावेळी म्हणाले. "मोदी खूप मेहनत घेतात आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळही देतात. एकदा का कोणतंही काम हाती घेतले की ते (काम) पूर्ण होईपर्यंत ते थांबणार नाही याची काळजी घेतात, असा मोदींचा स्वभाव आहे," असंही त्यांनी नमूद केलं.
मोदींची शैली निराळीपंतप्रधान मोदी त्यांच्या सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन आणि त्यांचे सहकारी कसे एकत्र येऊ शकतात यावर भर देतात. मित्रपक्षांना सोबत घेण्याची मोदींची पद्धत वेगळी आहे आणि ती शैली मनमोहन सिंग किंवा त्यापूर्वीच्या पंतप्रधानांमध्ये नसल्याचंही ते म्हणाले.
'सूडाचं राजकारण नसावं'"गुजरातचे तत्कालिन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरोधात कोणतंही सूडाचं राजकारण केलं जाऊ नये, असं माझं आणि तत्कालिन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं मत होतं. मोदी जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा मी केंद्रात होतो. जेव्हा पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावत असतं तेव्हा मोदी भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या गटाचं नेतृत्व करायचे आणि केंद्रावर हल्लाबोलही करत. अशा परिस्थितीत मोदींना कसं उत्तर द्यायचं याची रणनिती तयार केली जायची. युपीएमध्ये माझ्याशिवाय अन्य कोणताही मंत्री नव्हता जो मोदींशी चर्चा करू शकायचा. ते मनमोहन सिंग सरकारवर सातत्यानं हल्लाबोल करायचे," असं म्हणत पवार यांनी एक किस्सा सांगितला.
मनमोहन सिंग, पवार यांचं एकच मत"भलेही मोदी आणि भाजप यांच्यासोबत मतभेद असतील, तरी ते मुख्यमंत्री आहेत हे विसरता कामा नये, असं आपण युपीएच्या अंतरिम बैठकीत सर्वांना सांगायचो. त्यांच्या पाठी जनादेश आहे हेदेखील विसरता कामा नये. जर ते याठिकाणी काही मुद्दे मांडत असतील तर, मतभेद दूर करत त्यांचं निराकरण व्हावं आणि त्यांच्या राज्यातील लोकांचं हित जपलं जावं हे आपलं कर्तव्य आहे. मनमोहन सिंग यांनीदेखील या मताच स्वागत केलं होतं," असंही त्यांनी यावेळी सांगितलं.
"अजित पवारांना पाठवलं असतं तर...""जर आपण २०१९ च्या विधानसभा निवडणुकांनंतर अजित पवार यांना महाराष्ट्रात सरकार तयार करण्यासाठी भाजपशी हातमिळवणी करण्यास पाठवलं असतं, तर ते सरकार सत्तेत टिकलं असतं याची काळजी घेतली असती," असंही ते म्हणाले. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांनंतर संभाव्य राजकीय परिस्थितीबाब विचारताना त्यांना विरोधी पक्षाचे नेतृत्व करणार का असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी विरोधी पक्षाचं नेतृत्व करण्याऐवजी सरकारचं नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा आणि मार्गदर्शन करायचं असल्याचं त्यांनी सांगितलं.