नवी दिल्ली - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्लीतील शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली आहे. आज शरद पवारांचा वाढदिवस असून या निमित्ताने अजित पवार, सुनील तटकरे, प्रफुल पटेल, सुनेत्रा पवार, पार्थ पवार हे पवारांच्या भेटीला पोहचले. यावेळी राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवारही उपस्थित होत्या. या भेटीत अजित पवारांनी सपत्नीक शरद पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार एकत्र आल्याने चर्चांना उधाण आले आहे.
दिल्लीतील निवासस्थानी अजित पवारांसह पक्षातील प्रमुख नेते प्रफुल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ हेदेखील शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते. अजित पवार कालपासून दिल्लीत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील दिल्लीत भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेत आहेत. त्यात अजित पवारांनी दिल्लीत शरद पवारांची भेट घेतली त्यामुळे राजकीय भूमिकांमध्ये पवार कुटुंबातील संवाद कुठेही कमी झाला नसल्याचा संदेश या भेटीतून दिला जात आहे. आगामी काळातील राजकीय घडामोडी, महाराष्ट्रातील राजकारण यातून या भेटीला विशेष महत्त्व आलं आहे.
कौटुंबिक भेट की राजकीय चर्चा?
शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवार हे दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी पोहचले. या दोन्ही नेत्यांची भेट कौटुंबिक सांगितली तरी या भेटीवेळी राष्ट्रवादीचे प्रमुख नेतेही उपस्थित होते. त्यात प्रफुल पटेल, सुनील तटकरे, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार हेदेखील शरद पवारांच्या भेटीला गेल्याने या भेटीतून वेगळा संदेश राजकीय वर्तुळात गेला आहे. लोकसभेच्या पराभवानंतर अजित पवारांनी ताकदीने विधानसभा निवडणुकीत उभे राहिले. विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी लोकसभेत केलेली चूक जाहीरपणे कबुल केली होती. विधानसभा निवडणुकीच्या प्रचारातही या दोन्ही नेत्यांनी एकमेकांविरोधात वैयक्तिक टीका करणे टाळले होते. राजकारणात चांगले संबंध राहावेत यादृष्टीनेही संवाद महत्त्वाचा असतो असं शरद पवार कायम बोलतात. त्यामुळे ही भेट कौटुंबिक की राजकीय आहे का अशी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीने ८ जागांवर विजय मिळवला होता तर अजित पवारांच्या पक्षाने १ जागा जिंकली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीला दमदार यश मिळालं, मात्र केंद्रातील एनडीए सरकार चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार यांच्या पाठिंब्यावर टिकून आहे. त्यामुळे या भेटीतून भविष्यातील राजकीय गणिते जुळवण्याचा प्रयत्न आहे का किंवा राज्यातील महायुती सरकारमध्ये निकालानंतर नाराजीनाट्य पाहायला मिळाले. एकनाथ शिंदे यांची बार्गेनिंग पॉवर कमी करण्यासाठी अजित पवार प्रयत्नशील आहेत. त्यादृष्टीनेही ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.