नवी दिल्ली: लोकसभेत आज अविश्वास प्रस्तावावर चर्चा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी चार वाजता अविश्वास प्रस्तावावर उत्तर देणार आहेत. मोदी सरकारविरोधातील अविश्वास प्रस्तावावर लोकसभेत ८ ऑगस्टपासून चर्चा सुरु झाली. काँग्रेसचे गौरव गोगोई यांनी चर्चेला सुरुवात करताना विरोधकांचा अजेंडा मणिपूर असेल, असं स्पष्ट केलं होतं. तर काल राहुल गांधी यांनी मणिपूर हिंसाचाराच्या मुद्द्यावरुन भाजपा आणि पंतप्रधानांवर आक्रमकपणे हल्लाबोल केला.
काँग्रेसच्या अविश्वास प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना गृहमंत्री अमित शाह यांनी जोरदार युक्तिवाद केला. आजही दोन्ही बाजूचे खासदार अविश्वास ठरावावरील चर्चेत सहभागी होणार आहेत. शेवटी, नरेंद्र मोदी अविश्वास प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देतील. त्याआधी सत्ताधारी आणि विरोधक खासदार अविश्वास प्रस्तावावर आपलं मत मांडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी देखील अविश्वास प्रस्तावावर स्पष्टीकरण दिलं.
अमोल कोल्हे म्हणाले की, मी सरकारच्या विरोधात मांडलेल्या अविश्वास प्रस्तावाला समर्थन करण्यासाठी इथे उभा आहे. केंद्र सरकारच्या कार्यपद्धतीलकडे बघून मला महात्मा गांधी यांच्या तीन माकडांची आठवण येतेय. सरकारच्या विरोधातलं काहीही ऐकू नका, निवडणूकांशिवाय देशातील कोणतीही परिस्थिती बघू नका आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांची बोलती बंद करा. या सरकारवर आम्ही कसा विश्वास ठेवायचा, जी महागाई, अर्थव्यवस्थेवर बोलायला तयार नाही, असं अमोल कोल्हे म्हणाले.
आमचे शेतकरी गेल्या ४-५ वर्षांपासून जेव्हा टोमॅटो रस्त्यावर फेकून देत होते, तेव्हा तुमचं सरकारने त्यांना विचारलं नाही. तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचे डोळे फुसायला गेले नाही. त्यामुळे ज्यांना सामान्य जनतेची चिंता नाही, अशी सरकारवर माझा विश्वास नाही, असा घणाघात अमोल कोल्हेंनी केला. नुकतेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकमान्य टिळक यांचा पुरस्कार देऊन सन्मान केला गेला. मी त्यांचं अभिनंदन करतो. परंतु मी लोकमान्य टिळक यांच्या एका वाक्याची आठवण करुन देतो, सरकारचं डोकं ठिकाण्यावर आहे का?, याचं आत्मचिंतन करण्याची गरज असल्याचा निशाणा अमोल कोल्हे यांनी साधला.