NCP MP Praful Patel News: लोकसभा निवडणुकीनंतर आता संसदेच्या पावसाळी अधिवेनशानात खासदारांना शपथ देण्यात आली. लोकसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीए आणि इंडिया आघाडी पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत. यात आता एनडीए बाजी मारते की, इंडिया आघाडी लोकसभा निवडणुकाप्रमाणे बाजी पलटवते, याकडे देशाचे लक्ष लागले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी एक मोठा दावा केला आहे.
एनडीएकडून ओम बिर्ला आणि इंडिया आघाडीकडून काँग्रेस खासदार के.सुरेश यांनी लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. काँग्रेस पक्षाने सर्व खासदारांना व्हीप जारी करत निवडणुकीसाठी संसदेत हजर राहण्याचे निर्देश दिले आहे. तसेच भाजपानेही व्हीप जारी केल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर प्रफुल्ल पटेल यांनी केलेल्या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्याचे सांगितले जात आहे.
इंडिया आघाडीतील अनेक लोक एनडीएत येतील
विरोधी पक्षातील लोक जर हा विचार करत असतील की आमच्यामधील काही लोकांना पंक्चर करण्यात यशस्वी होतील. तर असे होणार नाहीत. आम्ही एनडीएबरोबरच राहणार आहोत. इंडिया आघाडीमधून अनेक लोक येणार आहेत. अजून थोडा वेळ जाऊद्या. नवा उत्साह आहे, त्यामुळे ते सध्या अशा पद्धतीचे बोलत आहेत. मात्र, येणारा वेळ सांगेल की इंडिया आघाडीमधील किती लोक पंक्चर होऊन आमच्या एनडीएत येतील. इंडिया आघाडी किती मजबूत आहे, हे येणारा काळच सांगेल, असे सूचक विधान प्रफुल्ल पटेल यांनी केले.