नवी दिल्ली - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नाव आणि चिन्हावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर सध्या केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान शरद पवार आणि अजित पवार गटाकडून आपआपली बाजू मांडली जात आहे. तसंच जाहीररित्या एकमेकांमवर टीकेचे बाणही सोडले जात आहे. अजित पवार गटाने शरद पवार गटातील खासदारांना अपात्र करण्यासंदर्भातील याचिका दाखल केली आहे. यामध्ये सातारा लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीनिवास पाटील यांचाही समावेश आहे. ८३ वर्षीय श्रीनिवास पाटील यांना अपात्र करण्यासाठी याचिका दाखल करण्यात आल्याने खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत अजित पवार गटाला लक्ष्य केलं होतं. सुळे यांच्या या टीकेला आज अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी उत्तर दिलं आहे.
"आदरणीय अजितदादांनी मागील ३० वर्षांत बारामती उभी केली. दादा...दादा बोलत ज्यांचं आतापर्यंतचं आयुष्य गेलं, त्यांनी अजितदादांना अपात्र करण्यासाठी याचिका केली. तेव्हा त्या सांगतात की राजकीय विचारधारा भिन्न असल्याने आम्ही हा निर्णय घेतला. श्रीनिवास पाटील यांच्याबद्दल आम्हा सर्वांनाच आदर आहे. ते सिक्कीमचे राज्यपाल असताना त्यांनी मला तिकडे नेऊन अनेक नवीन विषयांबाबत माहितीही दिली होती. ते आमच्या सर्वांसाठी पितृतुल्य आहेत. मात्र असं असलं तरी राजकीय लढाईवेळी वयोमर्यादा वगैरे मुद्दे येत नसतात," अशा शब्दांत सुनील तटकरेंनीसुप्रिया सुळेंवर पलटवार केला आहे. तसंच सतत वयाचा मुद्दा उपस्थित करून सुळे यांच्याकडून सहानुभूती मिळवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे, असा हल्लाबोलही तटकरेंनी केला आहे.
याचिकेत सुप्रिया सुळेंचाही समावेश
पक्षाच्या विचारधारेविरोधात असणाऱ्या सदस्यांना अपात्र करण्यासंदर्भात अजित पवार गटाकडून याचिका दाखल करण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना सुनील तटकरे म्हणाले की, "आम्ही सुप्रिया सुळे, मोहम्मद फैजल, श्रीनिवास पाटील यांना अपात्र करण्याबाबत याचिका दाखल केली आहे. मात्र शरद पवार साहेब हे आमचे दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात आम्ही कोणतीही याचिका दाखल केलेली नाही."
दरम्यान, स्वत:चं अपयश झाकण्यासाठी नैराश्यातून सुप्रिया सुळे आमच्यावर टीका करत असल्याचा खोचक टोलाही सुनील तटकरे यांनी लगावला आहे.