मुंबई: खासदारांनी संसदेत जास्तीत जास्त उपस्थित राहायला हवे. संसदेतील भाषणं ज्ञानात भर घालणारी असतात. त्यामुळे देशाच्या विविध राज्यांची परिस्थिती समजते. समस्या लक्षात येतात. अनेकादा इतरांमुळे आपल्या समस्या सुटतात. आपल्यामुळे इतरांना मदत होते, अशा शब्दांत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी संसदेचं महत्त्व सांगितलं. देशातील दोन मुख्यमंत्र्यांच्या कामाचं त्यांनी विशेष कौतुक केलं.
अनेकदा संसदेत एखादा प्रश्न मांडत असताना सर्वांचं एकमत होतं. उदाहरणार्थ, कुपोषणाचा प्रश्न असेल तर त्यावर कोणती बाजू मांडणार? समस्या सुटावी हेच सगळ्यांचं मत आहे. ती सोडण्यासाठीचे मार्ग, उपाय कदाचित वेगळे असू शकतात, असं सुळे म्हणाल्या. यावेळी त्यांनी ओदिशाच्या एका महिला खासदारासोबत झालेल्या चर्चेचं उदाहरण दिलं.सातच्या आत घरात...; सुप्रिया सुळेंनी सांगितली पवार घराण्याची शिस्त
'पालघरमध्ये कुपोषणाची समस्या मोठी आहे. एकदा माझ्या भाषणात मी त्याचा उल्लेख केला. त्यानंतर ओदिशाच्या एका महिला खासदारानं माझ्याशी संपर्क साधला. त्यांच्याकडेही तीच समस्या होती. मग मी त्यांना तुमच्या राज्यातल्या मुख्यमंत्री कार्यालयाला आमच्या महिला आणि बालकल्याण विभागाशी संपर्क साधायला सांगितलं. त्यानंतर दोन्ही राज्यांचे विभाग अनेकदा कामं करू लागले. आपल्या त्रुटी ते दाखवतात. आपल्याकडे चांगली योजना, उपक्रम असेल, तर आपण त्यांना सल्ला, मार्गदर्शन देतो,' असं सुळे यांनी सांगितलं.
ओदिशा, राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांचं कौतुकओदिशा, राजस्थानचे मुख्यमंत्री जीर्णोद्धारांची कामं अतिशय उत्तमपणे करत आहेत, असं म्हणत सुळेंनी त्यांच्या कामाचं तोंडभरून कौतुक केलं. 'भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खातं जीर्णोद्धाराचं काम उत्तम करत यात वादच नाही. मात्र ओदिशा आणि राजस्थानचे मुख्यमंत्री राज्य पातळीवर उत्तम काम करत आहेत. तसं काम देशात इतर कुठेच झालेलं नाही. ते वैयक्तिक लक्ष घालून जीर्णोद्धाराची कामं करत आहेत. त्यांच्या सहकार्यानं आपल्यालाही तशी काम करता येतील. अजिंठा, ऐलोरा, एलिफंटा, मुंबई विद्यापीठ, राजाबाई टॉवर अशा अनेक स्थळांचा जीर्णोद्धार करता येऊ शकेल,' असं सुळे म्हणाल्या.