Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादप्रश्न दिवसेंदिवस शिगेला जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या मुद्द्यावरून लोकसभेतही खडाजंगी झाली. राजकीय नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यासंदर्भात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना पत्रही दिले आहे. यानंतर अखेर अमित शाह (Amit Shah) यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांची भेट घेतली. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादप्रश्नी अमित शाह नक्कीच मार्ग काढतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी व्यक्त केला.
प्रसारमाध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, महाविकास आघाडीच्या खासदारांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद, राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, छत्रपती शिवाजी महाराज अवमान यासह शिंदे फडणवीस सरकारमधील वाचाळवीरांबाबत तक्रार केली, अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली. अमित शाह यांनी भेटीसाठी वेळ दिल्याबद्दल त्यांचे आभार मानते, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
गुजरात सरकारचा शपथविधी झाल्यावर मार्ग काढतील
अमित शाहांशी झालेल्या भेटीबाबत अधिक माहिती देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आम्ही ज्या गोष्टी त्यांच्यासमोर मांडल्या आहेत, त्या अतिशय संवेदनशीलपणे आणि राजकारण बाजूला ठेवून त्यांनी त्यामधून मार्ग काढावा, अशी विनंती अमित शाहांना केली आहे. यावर, तसेच गुजरात सरकारचा शपथविधी झाल्यानंतर काहीतरी मार्ग काढतील, असा शब्द त्यांनी दिला आहे. त्यामुळे यात केंद्राचा हस्तक्षेप होईल, असा मला विश्वास आहे, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री विरोधी पक्षाला विश्वासात घेत नाहीत. राज्याच्या हितासाठी कोणतीही कृती करताना ते दिसत नाहीत. कर्नाटकचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांवर दावा सांगितल्यानंतर २४ तासांत मुख्यमंत्र्यांनी भाष्य सुद्धा केले नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत. महाराष्ट्राचा, शिवरायांचा, फुले दाम्पत्याचा अपमान होतो तेव्हा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठराखण करण्याचे काम करतात, या शब्दांत सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघाती टीका केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"