नवी दिल्ली : संसद भवन संकुलात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठीचे कार्यालय राष्ट्रवादी काॅंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला दिले आहे, असे स्पष्टीकरण लोकसभा सचिवालयाने दिले आहे. अजित पवार गट हाच खरा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, असा निवडणूक आयोगाने याआधीच निर्णय दिलेला असताना लोकसभा सचिवालयाने असा निर्णय का घेतला? यावरून वादंग निर्माण झाला आहे.
नवे संसद भवन व संविधान सदन (संसदेची जुनी वास्तू) येथे लहान पक्षांना कार्यालयांचे वाटप केले आहे. त्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला संविधान सदनमधील १२६-डी हे कार्यालय दिल्याचे म्हटले होते.
उद्धवसेना, शिंदेसेनेची कार्यालये शेजारी
महाराष्ट्रातील शिंदेसेना व उद्धवसेना यांना संविधान सदनमध्ये परस्परांच्या शेजारी कार्यालयांची जागा देण्यात आली आहे.
बहुजन समाज पक्षाकडे असलेले कार्यालय उद्धवसेनेला दिले आहे. बसपचा राज्यसभेत एक खासदार आहे, लोकसभेत लोकप्रतिनिधी नाही. टीडीपीचेही संसद संकुलात कार्यालय
भाजपप्रणित एनडीएचा घटक पक्ष असलेल्या तेलुगू देसम पक्षाला संसद संकुलात कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. जनता दल (यू)ला संविधान सदनमध्ये कार्यालयासाठी जागा मिळाली. १८व्या लोकसभेच्या कार्यकाळाकरिता विविध पक्षांना ही कार्यालये देण्यात आली आहेत.