नवी दिल्ली - अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्यामुळे पक्षात दोन गट पडले आहेत. अजित पवार गटाला किती आमदारांचा पाठिंबा आहे, हे अद्याप निश्चित झाले नाही. तर, शरद पवार गटालाही आमदारांचा मोठा पाठिंबा आहे. त्यातच, शरद पवार यांनी पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर दिला असून, राज्यातील काही ठिकाणी दौरे करताना दिसत आहेत. यावेळी, सोडून गेलेल्यावर ते अप्रत्यक्षपणे टीका करतात. दरम्यान, शरद पवारांशी आजही बोलणे होते. त्यांच्याशी अजूनही संपर्कात असल्याचे राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते. आता, नव्या संसदेतील थेट शरद पवारांसमवेतचा फोटो त्यांनी शेअर केलाय.
ससंदेच्या विशेष अधिवेशनाचा आज दुसरा दिवस असून गणेशोत्सवाच्या शुभ मुहूर्तावर आज नवीन संसदेत खासदारांचा प्रवेश होत आहे. संसदेच्या नवीन इमारतीत प्रवेश करण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खासदारांना जुन्या संसदेतील सेंट्रल हॉलमध्ये संबोधित केले. या इमारतीमधील सेंट्रल हॉल देखील आपल्याला भावनिक करते आणि आपल्या कर्तव्यासाठी प्रेरणाही देते. १९५२ नंतर, या सेंट्रल हॉलमध्ये जगातील सुमारे ४१ राष्ट्रप्रमुखांनी आपल्या सर्व सन्माननीय खासदारांना संबोधित केले आहे. आपल्या सर्व राष्ट्रपतींनी येथे ८६ वेळा भाषणे दिली आहेत, असं नरेंद्र मोदींनी सांगितले. दरम्यान, मोदींच्या येथील भाषणानंतर नवीन संसदेत सर्वच खासदारांनी प्रवेश केला. त्यामध्ये, राज्यसभा खासदारांचाही समावेश आहे. मोदींनी नवीन राज्यसभेच्या सभागृहातही भाषण केलं.
नव्या संसदेतील राज्यसभा भवनमध्येही खासदारांनी फोटो काढून या सभागृहाचं कौतुक केलंय. खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासमवेतचा फोटो शेअर करत माहिती दिली. नवीन संसद भवनातील इलेक्ट्रीफाईंग दिवस, असे सांगत आजच्या पहिल्या दिवसाचं वर्णन खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केलंय. येथील राज्यसभा चेंबर चमत्कारीक आहे, त्यातच हा क्षण शरद पवार साहेबांसोबत शेअर करण्यात आल्याने क्षण अधिकच खास बनलाय. येथील कॅफेटेरियामध्ये मित्रांसह काही स्नॅक्स आणि सौहार्दाचा आस्वाद घेतल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच, खरोखरच लक्षात ठेवावा असा आजचा दिवस !, असे ट्विट प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय.
दरम्यान, राष्ट्रवादी पक्षात फुट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या भेटीगाठी झाल्याच्या चर्चा वारंवार सुरू असतात. अजित पवार गटाकडून शरद पवारांची मनधरणी करण्याचा अनेकदा प्रयत्न झाला. पण शरद पवार आपल्या मतावर ठाम आहेत. मात्र, आज पुन्हा एकदा प्रफुल्ल पटेल व शरद पवार यांची भेट झालीय.
शरद पवारांसमवेत माझे घरगुती संबंध
शरद पवार यांच्याशी माझे आजही बोलणे होते. मी त्यांच्या संपर्कात आहे. मागील वेळी अमरावतीला शरद पवार यांच्यासोबत आलो होतो. आता अजित पवारांसोबत आलो. आमचा पक्ष बळकट करण्यासाठी येथे आलो आहे. अनेकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. शरद पवार यांच्याबद्दल असलेला आदर आजही माझ्या मनामध्ये कायम आहे. आणि पुढेही राहील. शरद पवार माझे नेते होते आणि पुढेही राहतील, असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हटले होते. तसेच शरद पवारांनी मला १९७८ साली बोलवून घेतले. तेव्हापासून त्यांच्यासोबतच आहे. त्यांचे आणि माझे आजही घरगुती संबंध आहेत. माझे आणि शरद पवार यांचे आजही फोनवर बोलणे होत असते, असेही पटेल यांनी काही दिवसांपूर्वीच मीडियाशी बोलताना म्हटले होते.