- विकास झाडेनवी दिल्ली : २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला धूळ चारण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पवार त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी १५ पक्षांच्या नेत्यांसमवेत उद्या दुपारी ४ वाजता एक बैठक घेणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी सोमवारी शरद पवार यांची पुन्हा एकदा भेट घेतली. त्यात तिसऱ्या आघाडीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येते.
शरद पवार व प्रशांत किशोर या दोघांची दहा दिवसांपूर्वीच भेट झाली होती. दिल्लीतील पवारांच्या निवासस्थानी सोमवारी झालेल्या भेटीत त्यांच्याशी प्रशांत किशोर यांनी सुमारे दोन तास चर्चा केली. २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकांत मोदी सरकारला शह देण्यासाठी प्रादेशिक पक्षांची आघाडी स्थापन करण्याचा विचार पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केला होता. त्याची जबाबदारी माजी केंद्रीय मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते यशवंत सिन्हा यांच्यावर सोपविण्यात आली आहे. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना जो विजय मिळाला त्यामागे प्रशांत किशोर यांचीच रणनीती होती.
राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यसमितीचीही बैठक
राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या, मंगळवारी दिल्लीत होणार असून, त्यानंतर इतर पक्षांच्या नेत्यांशी शरद पवार चर्चा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी सांगितले की, संपूर्ण देशातील सर्व विरोधी पक्षांची मोट बांधण्याचे काम उद्यापासून शरद पवार करणार आहेत. त्या बैठकीत देशाची विद्यमान राजकीय स्थिती, लोकसभेचे आगामी अधिवेशन यासह अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होईल.
काँग्रेसबाबत अद्याप अनिश्चितता कायम
प्रादेशिक पक्षांमुळे त्या-त्या राज्यात मोदीविरोधी वातावरण ढवळून काढण्यात यश मिळेल, अशी ही रणनीती आहे. पवारांच्या निवासस्थानी उद्या होणाऱ्या बैठकीला काँग्रेसचे नेते उपस्थित राहण्याबाबत अनिश्चितता आहे. काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी या बैठकीला उपस्थित राहण्यास नकार दिला आहे.
तिसरी आघाडी उदयास आली तर काँग्रेसच्या नेतृत्वात सुरू झालेले यूपीएचे विसर्जन होणार का, याबाबतही आता तर्कवितर्क केले जात आहेत. काँग्रेसला वगळून स्थापन केलेली तिसरी आघाडी राजकीयदृष्ट्या कितपत फायदेशीर ठरेल याचाही विचार पवार यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत केला जाईल, असे सूत्रांनी सांगितले.