जम्मू -काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी मंगळवारी पर्यटकांवर केलेल्या गोळीबारात २८ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. दहशतवादी पोलिसांच्या वेशात होते. त्यामुळे पर्यटकांना संशय आला नाही. दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरलं, आधी त्यांची नावं विचारली, धर्म विचारला आणि नंतर पर्यटकांना गोळ्या घातल्या, असं काही प्रत्यक्षदर्शीनी सांगितलं आहे. याच दरम्यान अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरेही जम्मू काश्मीरमध्ये कुटुंबीयांसोबत पर्यटनाला गेल्या होत्या, त्या अडकल्या आहेत.
रुपाली पाटील ठोंबरे यांनी एक व्हिडीओ शेअर करून तेथील भयावह परिस्थिती सांगितली आहे. तसेच सरकारला विनंती केली आहे. "मी माझ्या सर्व कुटुंबासह श्रीनगर जम्मू काश्मीरला फिरायला आले होते. आजचा हल्ला झाल्यानंतर इथले सर्वजण प्रचंड घाबरलेले आहेत. काही पर्यटक आजच आलेले आहेत. काहींच्या परवा आणि त्यानंतरच्या फ्लाइट्स आहेत.त्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित दादा आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती आहे की, इथे जे पर्यटक अडकून पडले आहेत त्यांना तात्काळ येण्यासाठी व्यवस्था करण्यात यावी. कारण इथे प्रचंड घबराट पसरली आहे."
"सर्व पर्यटक आपल्या लहान मुलांसोबत फिरायला आले होते.काल आम्हाला पहलगामला गेल्यानंतर असं कोणतंही वातावरण दिसलं नाही.परंतु आजची परिस्थिती ऐकून जेव्हा आम्ही गंडोलाला होतो. तेव्हा आम्हाला तातडीने तिथला परिसर रिकामा करायला लावला. माझी शासनाला विनंती आहे की, महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक इथले पर्यटक ८० ते ९० टक्के आहेत. ते इथे अडकून पडले आहेत. प्रचंड घाबरलेले आहेत. त्यांना तातडीने सुरक्षितरित्या आपआपल्या राज्यात नेण्यासाठीची विमानसेवा उपलब्ध करुन द्यावी अशी माझी विनंती आहे" असं रुपाली पाटील ठोंबरे यांनी व्हिडीओमध्ये म्हटलं आहे.
स्वित्झर्लंडला जायचं होतं पण..."; ढसाढसा रडले आजोबा, गमावला एकुलता एक मुलगा
पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात हरियाणाच्या विनय नरवाल याचाही मृत्यू झाला आहे. २६ वर्षीय विनय नेव्हीमध्ये अधिकारी होता. ८ दिवसांपूर्वी त्याचं हिमांशीशी लग्न झालं होतं. याच दरम्यान विनयच्या लग्नाचा व्हिडीओही आता व्हायरल होत आहे. विनयचं १६ एप्रिल रोजी लग्न झालं होतं आणि त्यानंतर तो हनीमूनसाठी पहलगामला गेला होता. मात्र पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात त्याला जीव गमवावा लागला आहे.