Jitendra Awhad News: शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभेत सुनावणी सुरू आहे. शिवेसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता सुनावणी प्रकरणी निकाल देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना मुदतवाढ दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मीडियाशी बोलताना विविध मुद्द्यांवर स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना देण्यात आलेल्या मुदतवाढीबाबत बोलताना, अध्यक्षांनी मागणी केली असेल आणि न्यायालयाने निकाल दिला असेल तर काही गैर आहे असे वाटत नाही. फक्त निकाल व्यवस्थित द्यावा, अस आमचे मत आहे, असे जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. तसेच मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावर प्रतिक्रिया देताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की, छगन भुजबळ कधीच सरकारच्या बाहेर पडणार नाहीत. फक्त दोन कोंबडे झुंजवत ठेवायची सुपारी या दोघांनी घेतली आहे. जीआरचा व्यवस्थित अभ्यास केल्यावर समजेल काय ते. यांना गावागावांतील वातावरण खराब करायचे आहे, असा आरोप आव्हाड यांनी केला.
नथुराम गोडसे देशातील पहिला अतिरेकी
महात्मा गांधी यांना नथुराम गोडसेने मारले नाही असे सांगितले जात आहे. मग मारणारी एखादी अदृश्य शक्ती असेल. काही दिवसांनी म्हणतील महात्मा गांधी तिथे नव्हतेच. नथुराम गोडसे हा भारतातील पहिला अतिरेकी होता. त्यामुळे असल्या लेखकांवर न बोललेले बरे. अशांचा इतिहासाचा अभ्यास कमी आहे. अकलेचे तारे तोडणाऱ्या लोकांवर काय बोलणार? महात्मा गांधी यांचा खून नथुराम गोडसेने केला हे संपूर्ण देशाला माहिती आहे. नेहरूंनी काही काम केले नाही, मग काय अदृश्य शक्तीने हे केले का? महात्मा गांधींना मारून इंग्लंडला काय फायदा होणार होता? नेहरू-गांधींना बदनाम करण्याचा कट अनेक वर्ष सुरू आहे. वाद निर्माण करून राज्यसभेला काय होईल का हे पाहायचे काम सुरू आहे. जागतिक बाजारात याला मूर्खपणा म्हणतात. महाराष्ट्र सदनात अशा पुस्तक प्रदर्शनाला दिलीच कशी? गोळ्या कोणी झाडल्या हे पाहणारे अनेक साक्षीदार होते. त्यातले एक काकासाहेब गाडगीळ होते, या शब्दांत जितेंद्र आव्हाड यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, रणजित सावरकर लिखित ‘मेक शुअर गांधी इज डेड’ या पुस्तकावरून वाद निर्माण झाला आहे. नथुराम गोडसेच्या पिस्तुलाने झाडलेल्या गोळीने महात्मा गांधींची हत्या झाली नाही. या तपास नीट झाला नाही त्यामुळे गांधी हत्येचा फायदा नेहरु कुटुंबाला झाला, असा दावा करत, फॉरेन्सिक पुराव्याद्वारे आपण हे विधान करतोय. गांधी हत्येतील दडवलेले पुरावे बाहेर काढावेत अशी मागणीही सावरकरांनी केली आहे.