Sharad Pawar Action: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (NCP) सुप्रीमो शरद पवार (Sharad Pawar) यांनी मंगळवारी (8 ऑगस्ट) पक्षातील ज्येष्ठ नेते आणि आमदार थॉमस के थॉमस (Thomas K Thomas) यांची कार्यकारिणीतून हकालपट्टी केली. पक्षाविरोधी काम केल्यामुळे पवारांनी ही मोठी कारवाई केली आहे.
थॉमस हे केरळ विधानसभेतील कुट्टनाड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. केरळमधील सत्ताधारी लेफ्ट डेमोक्रॅटिक फ्रंट (LDF) सोबत NCP सत्तेत आहे. अलीकडेच थॉमस यांनी त्यांच्याच पक्षातील काही सदस्यांकडून आपल्या जीवाला कथित धोका असल्याची तक्रार राज्य पोलीस प्रमुखांकडे केली होती. त्यामुळेच राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर ही कारवाई केली आहे.
पवारांचे थॉमस यांना पत्र पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, केरळ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पीसी चाको यांनी थॉमस यांचे आरोप फेटाळून लावले आणि मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. तसेच, राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्षांच्या अधिकाराची उघडपणे पायमल्ली करुन आणि पक्षाच्या सदस्यांवर बेजबाबदार आरोप केल्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळल्याचे पवार यांनी थॉमस यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.पक्षातील तुमच्या पदाचा गैरवापर करुन खोट्या तक्रारी दाखल करणे, यामुळे लोकांमध्ये चांगले संकेत जाणार नाही. तुमचे हे कृत्य पाहता तुम्हाला कार्यकारिणीतून निलंबित करत आहे, असे पवारांनी पत्रात म्हटले.
काय म्हणाले होते आमदार थॉमस
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार थॉमस के थॉमस यांनी सोमवारी (7 ऑगस्ट) राज्य पोलीस प्रमुखांकडे तक्रार दाखल केली की, पक्षाचे काही सदस्य त्यांना ठार मारण्याचा कट रचत आहेत. अलाप्पुझा येथील कुट्टनाड जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यासाठी हा कट रचला आहे, असे त्यांनी तक्रारीत म्हटले.