नवी दिल्ली - दिवाळीत कौटुंबिक कार्यक्रमासाठी एकत्र आलेले पवार कुटुंब आज पुन्हा वेगळे झाल्याचे दिसले. खरी राष्ट्रवादी कुणाची याबाबत सध्या निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू आहे. आजच्या सुनावणीत शरद पवार गटाकडून अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद करत अजित पवार गटावर गंभीर आरोप केले. त्यात प्रताप सिंह चौधरी नावाचे शरद पवार गटाचे नेते त्यांच्या नावाचे खोटे प्रतिज्ञापत्र अजित पवार गटाने सादर केल्याचं म्हटलं. प्रताप सिंह चौधरी यांना शरद पवार गटाने निवडणूक आयोगासमोर उभे केले.अजित पवार गटाने केलेल्या फसवणूक आणि खोटी प्रमाणपत्रे यावरून निवडणूक आयोगाने फौजदारी खटला न्यायालयात दाखल करावा अशी मागणी शरद पवार गटाकडून करण्यात आली.
शरद पवार गटाचे वकील अभिषेक मनु सिंघवी म्हणाले की, आज निवडणूक आयोगासमोर व्यापक सुनावणी पार पडली. माझा युक्तिवाद पूर्ण झाला. आता विरुद्ध पक्षकाराचा युक्तिवाद सुरू झाला. या प्रकरणाची पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे. आजच्या माझ्या युक्तिवादात अजित पवार गटाकडून हजारो बोगस प्रतिज्ञापत्रे, दस्तावेज आयोगासमोर दाखल केलेत ते आयोगासमोर मांडले. यात २४ प्रकारचे फ्रॉड करण्यात आले. त्यात कोणी मृत व्यक्ती आहे, अल्पवयीन मुले आहेत, झोमॅटोत काम करणारा त्यांचे प्रतिज्ञापत्रे आयोगाला दिले आहेत. त्यात आज आम्ही विचित्र प्रसंग समोर ठेवला. निवडणूक आयोगासमोर सुनावणी सुरू असतानाच २७ ऑक्टोबरला अजित पवार गटाने प्रतिज्ञापत्रे दाखल केलेत. त्यात आमच्यासोबत असणारे प्रताप सिंह चौधरी यांनी अजित पवारांचे समर्थन केल्याचे दाखवले. चौधरी यांना हे माहितीच नव्हते. त्यांना कळाले तेव्हा धक्का बसला. आज आम्ही प्रताप सिंह चौधरी यांचे प्रतिज्ञपत्र दाखल केले त्याचसोबत त्यांना आयोगसमोर उभे केले. चौधरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे स्थापनेपासूनचे सदस्य आहेत. त्यांना न कळताच त्यांचे खोटे प्रतिज्ञापत्र दाखल केले असा आरोप करण्यात आला.
त्याचसोबत काहीही विचार न करता निर्लज्जपणे बोगस कागदपत्रे दाखल केली जातात.हजारो प्रतिज्ञापत्रे आहेत. आम्ही प्राथमिक स्वरुपात केवळ ९ हजार प्रतिज्ञापत्रे दाखवलेत. निवडणूक आयोगाला अधिकार आहे. या प्रकरणी फौजदारी कारवाई न्यायालयासमोर न्यावी. हा एक प्रकारचा फसवणुकीचा गुन्हा आहे. खोटी आणि बनावट प्रतिज्ञापत्रे दाखल करणे हा गुन्हा आहे.आम्ही अजित पवार गटाचा पर्दाफाश केला आहे. न्यायाचा विजय होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. अजित पवार गटाकडून प्रतिज्ञापत्रे सादर केलीत. परंतु त्यात एकही प्रतिज्ञापत्र असे नाही ज्यात शरद पवारांविरोधात काही लिहिलं. अजित पवारांना मी नेता मानतो असं प्रतिज्ञापत्र आहेत. परंतु शरद पवारांच्या विरोधात मी अजित पवार गटाचे समर्थन करते असं लिहिलेले नाही. कुठल्याही प्रतिज्ञापत्रात असे काही लिहिले नाही. खोटी आणि दिशाभूल करणारी प्रतिज्ञापत्रे घेतली आहे असंही अभिषेक मनु सिंघवी यांनी म्हटलं.
दरम्यान, तुम्ही खोट्या प्रतिज्ञापत्रावर स्वत:चा पक्ष उभा करताय त्यावर तुमची नितिमत्ता दिसून येते.अजित पवार गटाचे देवदत्त कामत यांनी ३१ ते ५ जुलै दरम्यान कधीही संबंधित नेत्यांनी शरद पवारांवर आक्षेप घेतले नाही असं निवडणूक आयोगासमोर आणले. खोटे कागदपत्रे दाखल करणे गुन्हा आहे. प्रताप सिंह चौधरी यांच्या प्रतिज्ञापत्राबद्दल आम्ही पोलीस तक्रारही दाखल करू असं पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.