नवी दिल्ली, दि. 11 - दिल्लीतल्या संसद भवनातल्या सभागृहात विरोधी पक्षांची बैठक सुरू आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींनी ही बैठक बोलावली असून, माजी पंतप्रधान मनमोहन सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, उमर अब्दुल्ला, गुलाम नबी आझादांसह अनेक नेते उपस्थित आहेत. मात्र राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी बैठकीला दांडी मारली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी विरोधकांची मोट बांधण्यासाठी ही बैठक बोलावली आहे. जनता दल संयुक्त या पक्षालाही बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. काँग्रेसला या बैठकीला 18 पक्षांचे नेते सहभागी होतील, अशी आशा आहे. मात्र काँग्रेसनं अद्यापही जनता दल संयुक्तला स्वतःच्या यादीतून बाहेर काढलेलं नाही.
गेल्या काही दिवसांपूर्वी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला होता. देशात अशा काही संघटना आहेत, ज्यांचा देशाच्या स्वातंत्र चळवळीत काहीही सहभाग नव्हता, त्यांनी महात्मा गांधींनी चालवलेल्या 'चले जाव' चळवळीलाही विरोध केला होता. अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर सडकून टीका केली होती. स्वातंत्र्य चळवळीतील महत्वाचा भाग असणाऱ्या ‘चले जाव’ चळवळीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्तानं त्या लोकसभेत विशेष सत्रात बोलत होत्या. स्वातंत्र्य चळवळीदरम्यान पंडित नेहरुंनी त्यांच्या जीवनातील अनेक वर्ष तुरुंगात घालवली. अनेक काँग्रेस नेत्यांचा तुरुंगातच मृत्यू झाला. इंग्रजांनी भारतातून निघून जावं, यासाठी सुरू झालेल्या ‘चले जाव’ चळवळीदरम्यान आंदोलकांवर अनेक अत्याचार झाले. पण तरीही काँग्रेसचे नेते मागे हटले नाहीत, असं मत स्वातंत्र्य चळवळीतील माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इतर काँग्रेस नेत्यांविषयी सोनिया गांधी यांनी व्यक्त केलं. सोनिया गांधी यांच्या या वक्तव्यानंतर लोकसभेत काही सदस्यांनी गदारोळही केला होता.