NCP SP Group MP Supriya Sule Reaction On Waqf Amendment Bill: वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाने कंबर कसली आहे. बुधवारी, ०२ एप्रिल २०२५ रोजी वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मांडले जाणार असल्याचे सांगितले जात आहे. याच संदर्भात एनडीएचे नेतृत्व करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आपल्या सर्व खासदारांना लोकसभेत उपस्थित राहण्यासाठी व्हिपदेखील जारी केला आहे. वक्फ सुधारणा विधेयकावरून राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाल्या असून, इंडिया आघाडीसह अनेक पक्षाचे नेते या विधेयकावरून विविध मते मांडत आहेत. वक्फ सुधारणा विधेयकामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचे सांगितले जात असून, बैठकांचे सत्र तीव्र झाले आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली.
"दिशाभूल करू नका, चर्चा करूया", वक्फ दुरुस्ती विधेयकावर किरेन रिजिजू यांचे मोठे वक्तव्य
भाजपाने व्हिपमध्ये सर्व खासदारांना संपूर्ण दिवसभर उपस्थित राहण्यास सांगितले आहे. भाजपाचे लोकसभेत २४० खासदार आहेत. तर, भाजपच्या नेतृत्वाखालील NDAचा विचार करता, NDAचे लोकसभेत २९३ सदस्य आहेत. ही संख्या, वक्फ सुधारणा विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असलेल्या २७२ या मॅजिक फिगरच्या तुलनेत अधिक आहे. मात्र असे असले तरी, सरकार जेडीयू आणि टीडीपीवर अवलंबून आहे. अशा स्थितीत, या विधेयकासंदर्भात कोणता पक्ष काय भूमिका घेतो, हे बघण्यासारखे असेल. दिल्लीत संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळे यांनी वक्फ सुधारणा विधेयकाबाबत स्पष्ट शब्दांत भाष्य केले.
२ सभागृह, ४८ तास कालावधी...; वक्फ विधेयक मंजूर करण्यासाठी भाजपाचा 'बिग प्लॅन'
आम्ही पूर्ण ताकदीने आणि एकत्रितपणे...
वक्फ सुधारणा विधेयकाबाबत रणनीतिचा मुद्दा नाही. हा अधिकारांचा प्रश्न आहे. एका सशक्त लोकशाहीत कोणाच्या मन-मर्जीने देश चालू शकत नाही. हा देश आपल्या संविधानानुसार चालतो. आम्ही चर्चेत सहभागी होणार. आम्ही जशी त्यांची मते ऐकणार, तसेच आम्ही सत्यासोबत तसेच संविधानाच्या बाजूने असणाऱ्यांसोबत एकत्र असणार आहोत. इंडिया आघाडीत या मुद्द्यावर चांगल्या पद्धतीने चर्चा झाली. आम्ही पूर्ण ताकदीने आणि एकत्रितपणे चर्चेत सहभागी होणार आहोत.
2025 पूर्वीची मालमत्ता वक्फकडेच राहणार; विधेयकात कोणत्या प्रमुख सुधारणा? जाणून घ्या...
दरम्यान, भाजपाने हे विधेयक ४८ तासांत संसदेच्या दोन्ही सभागृहात मांडण्याची तयारी केली आहे. २ एप्रिल रोजी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मांडले जाईल. सरकारने यासाठी ८ तासांच्या चर्चेचा अवधी निश्चित केला आहे. कामकाज सल्लागार समितीत या विधेयकावर त्याच दिवशी चर्चा होईल असे ठरवण्यात आले आहे. या विधेयकासाठी भाजपा जास्त दिवस वाट पाहणार नाही. लोकसभेत २ एप्रिलला चर्चा पूर्ण झाली नाही तर पुढील दिवशीही चर्चा सुरू राहील. विरोधकांचा विरोध कमी करत आणि घटक पक्षांना सोबत घेऊन विधेयक लोकसभेत पारीत करण्याचे भाजपाचे टार्गेट आहे. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ४ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे कमीत कमी लोकसभेत वक्फ सुधारणा विधेयक मंजूर व्हावे, असे भाजपाला वाटते. राज्यसभेत एनडीएकडे बहुमतासाठी काही मतांची गरज आहे. त्यांच्याकडे जवळपास ११५ खासदार आहेत परंतु काही छाटे पक्ष, अपक्षांनासोबत घेत भाजपा राज्यसभेतही विधेयक मंजूर करू शकते. जर राज्यसभेत वेळ कमी पडला तर पुढील अधिवेशनापर्यंत चर्चा टाळली जाऊ शकते.