ईशान्येकडील राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपला चांगले यश मिळाले. म्हणूनच जनादेशाचा आदर म्हणून नागालॅंडमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सत्तेत सहभागी झाला असावा. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस एका आघाडीत असण्यात काहीही गैर नाही, अशी भूमिका केंद्रीय परराष्ट्र व सांस्कृतिक राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी मांडली.
‘लोकमत नॅशनल कॉन्क्लेव्ह’मध्ये लोकमत समाचारचे वरिष्ठ संपादक विकास मिश्र यांनी श्रीमती लेखी यांची मुलाखत घेतली. घराणेशाहीवर चालणारे पक्ष अजूनही राजकारणात आहेत. त्यांना हद्दपार करण्याची हीच वेळ आहे, असे सांगून त्या म्हणाल्या की, स्वातंत्र्यानंतर ६० वर्षे घराणेशाहीवर चालणाऱ्या एकाच पक्षाने राज्य केले व तोच कॉंग्रेस पक्ष सर्वाधिक लाेकशाहीविराेधी आहे. या पक्षाचे नेते केंद्र शासनाविरोधात प्रश्न उपस्थित करतात तेव्हा त्यांची विश्वासार्हता तपासायला हवी. सत्तेचे साेन्याचे ताट हिरावले गेले असल्याने ते तडफडत आहेत.
कॉंग्रेसने कधीही गरिबांसाठी काम केले नाही. गरिबी हटविण्याचा केवळ नारा दिला. आताचे सरकार प्रत्यक्ष गरिबांना सुविधा देत असल्याने त्यांचा जळफळाट होतो आहे. त्यातूनच त्यांचे नेते विदेशात जाऊन भारताची बदनामी करतात. परीक्षेत नापास मुले जसे प्रश्न ‘आउट ऑफ काेर्स’ आल्याचा बहाणा करतात, तशी अवस्था त्यांची झाली आहे. हे देशात निवडणुका हरतात व कॅम्ब्रिजमध्ये जाऊन आराेप करतात. संधी होती तेव्हा काम केले नाही. आता काेणत्या ताेंडाने निवडणुका लढतील, असा सवाल त्यांनी केला. ऐंशीच्या दशकात भारत प्रत्येक मानकानुसार चीनच्या समाेर हाेता. मात्र चुकीच्या धाेरणांमुळे भारत मागे पडला व चीन समाेर गेला. २००४ ते २०१४ या कालावधीत भारतात भ्रष्टाचार बाेकाळला हाेता व तेव्हाच चीनने प्रगती साधली. आता मात्र भारताची स्थिती सुधारत आहे. आर्थिक शक्ती वाढविल्यास चीनचा मुकाबला सहज शक्य आहे, असा दावा मीनाक्षी लेखी यांनी केला. आज संपूर्ण जगात वेगळ्या हालचाली हाेत आहेत. काेणताही देश आपल्या वर्चस्वासाठी काेणत्याही देशाशी करार करू शकताे, असे मत लेखी यांनी मांडले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"