NCP vs BJP: महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून महाराष्ट्रात भाजप विरूद्ध महाराष्ट्र सरकार असा संघर्ष सुरू झाला आहे. दोन्ही पक्षांचे नेते प्रचंड आक्रमक होत असल्याचे चित्र आहेत. गेल्या काही महिन्यात भाजपाचेकिरीट सोमय्या आणि रवी राणा-नवनीत राणा हे नेते शिवसेनेविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या नेत्यांवर अपेक्षित कारवाई करण्यात आली. तसेच काही कार्यकर्ते या नेत्यांविरोधात आक्रमक झाले. त्यामुळे भाजपाच्या काही नेत्यांना केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरवण्यात आली. त्यावरूनच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे मंत्री जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला खोचक टोला लगावला.
"अलीकडे राज्यात नवीन फॅशन सुरू झाली आहे. केंद्र सरकारमधूनच संरक्षण पुरवलं जातं आणि त्याची दोन-तीन उदाहरणे दिसू लागली आहेत. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच केंद्र सरकार राज्यातील व्यक्तींना संरक्षण देत आहे. त्यामुळे तुमची भाजपाबरोबर चांगली मैत्री असेल तर तुम्हालाही संरक्षण देण्याची व्यवस्था होऊ शकते", असा टोला जयंत पाटील यांनी लगावला. पुढे बोलताना असेही म्हणाले, "राज ठाकरे यांना कोणी इजा करेल, असे मला वाटत नाही. राज ठाकरे यांना धोका आहे पण त्यांना भीती वाटत असेल, तर त्यांना संरक्षण दिले पाहिजे. आमची कोणतीही तक्रार नाही."
सदाभाऊ खोत यांच्या महागाई संदर्भातील वक्तव्याबाबतही त्यांनी मत मांडले. उपरोधिकपणे सदाभाऊ खोत भाजपाच्या विरोधात बोलू शकत नाहीत, कारण त्यांची विधानपरिषदेची मुदत संपत आली आहे. अशा वेळी काय बोलायचं ते त्यांना कळत नसावे, अशी मिश्किल टीका जयंत पाटील यांनी केली. सदाभाऊ खोतांच्या वक्तव्यावर हसायचं की रडायचं हेच कळत नाही. सदाभाऊ खोत यांनी महागाईचे समर्थन केले आहे. या देशात महागाईने सामान्य जनता होरपळत आहे. एवढी प्रचंड महागाई आहे. शंभरीपार पेट्रोल गेले आहे तरी केंद्रात बसलेले नेते मनमोहन सिंग यांच्या सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरत होते. आज १२५ वर पेट्रोल गेले. परवाच गॅस ५० रुपयांनी वाढला. देशभर लोकांना महागाईची झळ बसली आहे त्यामुळे सदाभाऊ खोत यांनादेखील महागाईची झळ बसली असेल तर कदाचित उपरोधाने ते बोलले असतील अशी शंका जयंत पाटील यांनी व्यक्त केली.