सूरत, दि. 10 - गुजरात राज्यसभा निवडणुकीत भाजपाने आपली संपूर्ण ताकत पणाला लावूनही काँग्रेसचे चाणक्य अहमद पटेल विजयी झाले. या राज्यसभा निवडणुकीत प्रत्येक एक मत महत्वाचे असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन आमदारांनी भाजपा आणि काँग्रेस दोघांच्या बाजूने मतदान केले. कंधाल जाडेजा यांनी भाजपाच्या बाजूने तर, जयंत पटेल यांनी काँग्रेसच्या बाजूने मतदान केले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेस आणि भाजपा दोघांना खूश ठेवण्याचा प्रयत्न केला अशी चर्चा आहे. कंधाल जाडेजा हे पोरबंदर जिल्ह्यातील कुतियाना विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व करतात तर, जयंत पटेल आनंद जिल्ह्यातील उमरेठ मतदारसंघाचे आमदार आहेत. जाडेजा यांच्यावर अनेक गुन्ह्यांची नोंद आहे. भाजपाने त्यांना नोव्हेंबर अखेरीस होणा-या विधानसभा निवडणुकीत फक्त तिकीट देण्याचेच नव्हे तर, भाजपाच्या नियंत्रणाखाली असलेल्या डेअरी उद्योगात महत्वाची भूमिका देण्याचा त्यांना शब्द देण्यात आल्याची चर्चा आहे.
उमरेठचे आमदार जयंत पटेल यांनी राज्यसभा निवडणुकीच्या निमित्ताने 2012 च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने केलेल्या मदतीची परतफेड केली. जयंत पटेल यांचा मतदारसंघ आनंद जिल्ह्यात येतो हा जिल्हा काँग्रेसचे प्रमुख नेते भरतसिंह सोलंकी यांचा बालेकिल्ला आहे. जयंत पटेल आधी सारसामधून आमदार होते. मतदारसंघ फेररचनेत त्यांचा मतदारसंघ गायब झाल्यानंतर ते सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात होते. त्यावेळी त्यांना उमरेठचा सुरक्षित मतदारसंघ देण्यात आला. पुन्हा निवडून येण्यासाठी त्यांना काँग्रेसच्या पाठिंब्याची आवश्यकता आहे त्यामुळे त्यांनी अहमद पटेल यांना मतदान केले.
सत्यमेव जयते! विजयानंतर अहमद पटेल यांची प्रतिक्रियाअत्यंत आव्हानात्मक ठरलेल्या निवडणुकीत भाजपाध्यक्ष अमित शहांची रणनीती आणि भाजपाचे सर्व प्रयत्न हाणून पाडत विजय मिळवल्यानंतर अहमद पटेल यांनी सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली आहे. काल राज्यसभेच्या निवडणुकीत मतदान झाल्यानंतर राजकीय नाट्य रंगले होते. मात्र अनेक वळणे घेतल्यानंतर आज मध्य रात्री पावणे दोन वाजता निवडणुकीचा निकाल लागला आणि त्यात अहमद पटेल यांनी 44 मते मिळवत अर्ध्या मताने विजय मिळवला.
या विजयानंतर अहमद पटेल यांनी ट्विटरवरून सत्यमेव जयते अशी प्रतिक्रिया दिली. "ही निवडणूक माझ्या राजकीय कारकीर्दीतील सर्वात अवघड निवडणूक होती. बऱ्याच निवडणुका लढवल्या मात्र एवढे आव्हान कधी मिळाले नव्हते. भाजपाकडून मला पराभूत करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न करण्यात आले. केंद्र आणि राज्य सरकारने मला पराभूत करण्यासाठी कंबर कसली होती. त्यांचा यामागे काय हेतू होता हे माहीत नाही." असे अहमद पटेल म्हणाले.