- शीलेश शर्मा नवी दिल्ली : सत्तारूढ भाजपला सशक्त पर्याय उभा करण्यासाठी विरोधी पक्षांची एकजूट करण्याचे प्रयत्न केले जात असताना नितीशकुमार यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने बैठकीत सहभागी होण्यास नकार दिला. तथापि, शरद पवार यांना बरे वाटत नसल्याने ते बैठकीला येऊ शकले नाहीत, असे काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी सांगितले. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला १६ राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते.गुजरातनंतर राष्टÑवादी काँग्रेस केंद्रातही भाजपशी हातमिळविणी करण्याचा गंभीर विचार करीत असून, मोदी सरकारमध्ये भागीदार होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. परंतु त्या दृष्टीने अद्याप अंतिम निर्णय होणे बाकी आहे.मोदींविरुद्ध राजकीय वातावरण तयार करण्यासाठी देशव्यापी संघर्ष करण्याचा निर्णय डाव्या पक्षांनी घेतला आहे. यात सामील व्हायचे की नाही, याचा निर्णय अन्य पक्षांना घ्यायचा आहे, असे येचुरी यांनी सांगितले. गुजरातेमधील राज्यसभेच्या निवडणुकीतील भाजपच्या भूमिकेची तुलना माफियांच्या टोळीशी केली. भाजपने गुजरातमधील निवडणुकीत जे काही केले, त्यावरून आगामी निवडणुकीत तो पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतो, असा तर्क बैठकीला उपस्थित असलेल्या नेत्यांनी काढला. बैठकीला अहमद पटेलही उपस्थित होते. गुलाम नबी आझाद म्हणाले की, विरोधी पक्ष एकत्र येऊ न मोदी सरकारविरुद्ध मोहीम सुरू करण्याच्या तयारीत आहेत. सर्व पक्षांशी चर्चा करून कार्यक्रम तयार करण्यासाठी कोअर कमिटी स्थापन करण्याचे अधिकार सोनिया गांधी यांना देण्यात आले आहेत.महारॅलीत सहभागी होणार२७ आॅगस्ट रोजी लालूप्रसाद यादव यांनी आयोजित केलेल्या महारॅलीत सर्व विरोधी पक्ष सहभागी होणार आहेत. विरोधी पक्षांच्या एकजुटीचे प्रयत्न शाबूत ठेवण्यासाठी गुलाम नबी आझाद हे पुन्हा एकदा शरद पवार यांच्याशी चर्चा करतील.आजच्या बैठकीत केरळमधील मणी ग्रुपसुद्धा सहभागी होऊ शकला नाही. मनमोहनसिंग, अहमद पटेल, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, अली अन्वर, डी. राजा, सतीश मिश्रा, नरेश अग्रवाल, बद्रीऊद्दीन अजमल, ए. के. अॅन्टोनी बैठकीला उपस्थित होते.
विरोधी पक्षांच्या एकजुटीला राष्ट्रवादीचा हादरा, शरद पवार यांची गैरहजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2017 3:41 AM