नवी दिल्ली : देशामध्ये दररोज बलात्काराच्या ७७ व हत्येच्या ८० घटना घडतात. महिलांसाठीदिल्ली, राजस्थान ही सर्वात असुरक्षित ठिकाणे आहेत. २०१९च्या तुलनेत २०२० साली महिलांवरील अत्याचाराच्या गुन्ह्यांत घट झाली आहे. बलात्काराच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये झाल्या असून, यासंदर्भात महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. १९ मोठ्या शहरांपैकी सर्वाधिक गुन्हे दिल्लीमध्ये घडले आहेत, तर मुंबईमध्ये २०२० साली पाच हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
देशभरात २०२० साली घडलेल्या गुन्ह्यांची आकडेवारी नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) बुधवारी प्रसिद्ध केली. त्यात म्हटले आहे की, भारतामध्ये गेल्या वर्षी हत्यांच्या घटनांत वाढ झाली आहे. उत्तर प्रदेशात सर्वाधिक हत्या झाल्या आहेत. २०२० साली बलात्काराच्या २८,०४६ घटना घडल्या. त्यापैकी सर्वाधिक बलात्कार राजस्थान व त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये झाले आहेत. मात्र त्या वर्षात अपहरणाच्या घटनांमध्ये घट झाली.