एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2024 06:13 PM2024-06-02T18:13:04+5:302024-06-02T18:13:44+5:30
शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा संपताच विविध चॅनेल्स, संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये भाजपा युतीला बहुमत मिळताना दाखविण्यात आले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे दोन दिवस राहिले आहेत. शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा संपताच विविध चॅनेल्स, संस्थांनी त्यांचे एक्झिट पोल जाहीर केले. यामध्ये भाजपा युतीला बहुमत मिळताना दाखविण्यात आले आहे. तर या एक्झिट पोलनंतर लगेचच लोकसभा निवडणुकीसाठी घेतलेल्या ई मतदानाचा निकाल जाहीर करण्यात आला आहे.
आजतकने हे ई मतदान घेतले आहे. भाजपाने यावेळी ४०० पारचा नारा दिला होता. या मतदानात भाजपाप्रणित एनडीएला ३९७ जागा मिळताना दिसत आहेत. एनडीएला जवळपास ७३ टक्के लोकांनी मत दिले आहे. तर इंडिया आघाडीला २३ टक्के मते मिळाली आहेत. ४ टक्के मते इतरला मिळाली आहेत. ही मते जागांमध्ये वाटल्यानंतर भाजपा युतीला ३९७ जागा मिळत आहेत. तर इंडिया आघाडीला १२१ जागा मिळताना दिसत आहेत. इतरांच्या वाट्याला २५ जागा दिसत आहेत.
हे मतदान काही खरे नसले तरी इंटरनेटवर असणाऱ्या लोकांचा मुड जाणून घेण्यासाठी घेण्यात आले होते. या काळात १.३० लाख लोकांनी त्यांचे त्यांचे राज्य निवडून, मोबाईल नंबर भरून त्या त्या पक्षाला मतदान केले आहे. दिल्लीत एक्झिट पोलप्रमाणेच या मतदानातही भाजपला सहा जागा मिळतील आणि इंडी आघाडीला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये एनडीएला 18 तर काँग्रेसला 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. उत्तर प्रदेशमध्ये एनडीएला 57 जागा मिळू शकतात तर इंडी आघाडीला 20 जागा मिळू शकतात तर इतरांना तीन जागा मिळू शकतात. दक्षिण भारतात, इंडी आघाडी आणि भाजप यांच्यात चुरशीची स्पर्धा आहे. मात्र, केरळ, कर्नाटक आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये भाजपला सर्वाधिक मते मिळाली आहेत.
भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या ईशान्येकडील राज्यांत इंडी आघाडीच्या बाजूने लाट दिसून आली आहे. मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये काँग्रेसला सर्वाधिक मते मिळाली आहेत. आसाममधील बहुतांश लोकांनी भाजपच्या बाजूने मतदान केले आहे. बिहारमध्ये एनडीएला 29, इंडी आघाडीला 9 आणि इतरांना 2 जागा मिळताना दिसत आहेत.
महाराष्ट्रात काय...
महाराष्ट्रात एक्झिट पोलनी एनडीए आणि इंडी आघाडीत चुरस दाखविलेली असताना ई मतदानात मात्र एनडीएच्या बाजुने ७० टक्के मते गेली आहेत. इंडी आघाडीला २८ टक्के मते आहेत. इतरांना तीन टक्के मते मिळाली आहेत. यानुसार ४८ पैकी ३३ जागा एनडीएला, मविआला १३ आणि इतरांना १ जागा मिळताना दिसत आहे.