नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीसाठीचे मतदान आटोपल्यानंतर विविध वृत्तसंस्थांनी आपापली एक्झिट पोल जाहीर केली होती. या एक्झिट पोलमध्ये एनडीए बहुमतापर्यंत पोहोचेल असा सर्वसाधारण अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतरच्या परिस्थितीचा कानोसा घेण्यासाठी काँग्रेसकडूनही एक्झिट पोल घेण्यात आले असून, या एक्झिट पोलमध्येही एनडीएला यूपीएपेक्षा जास्त जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र भाजपाला दोनशेहून कमी जागा मिळतील आणि एनडीएला केवळ 230 पर्यंत जागा मिळतील असे या एक्झिट पोलमध्ये म्हटले आहे. तर काँग्रेस स्वबळावर 140 जागा जिंकेल आणि यूपीएला 195 जागा मिळतील, असा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. काँग्रेसने घेतलेल्या अंतर्गत एक्झिट पोलनुसार यूपीएला तामिळनाडू, केरळ आणि पंजाबमध्ये चांगले यश मिळेल. तसेच बिहार, छत्तीसगड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, झारखंड आणि हरियाणा या राज्यांमध्येही पक्षाची कामगिरी चांगली होणार आहे. यूपीएला बिहारमध्ये 15, महाराष्ट्रात 22 ते 24, तामिळनाडूत 34 केरळमध्ये 15, कर्नाटकात 11 ते 13 आणि मध्य प्रदेशात 8 ते 10 जागा मिळण्याचा अंदाज या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. त्याशिवाय गुजरातमध्ये 7, हरियाणात 5 ते 6, छत्तीसगडमध्ये 9 आणि पूर्वोत्त राज्यांत 9 ते 10 जागा मिळण्याची अपेक्षा काँग्रेसमध्ये आहे. सर्व एक्झिट पोल काँग्रेसला उत्तर प्रदेशात केवळ 2 जागा देत असले तरी या एक्झिट पोलमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशात 5 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, दक्षिण भारतात काँग्रेस आणि एनडीएला चांगले यश मिळेल,अशी अपेक्षा या एक्झिट पोलमधून व्यक्त करण्यात आली आहे. विविध निवडणूक क्षेत्रांमध्ये उपस्थित असलेले 260 पर्यवेक्षक, राज्यांचे प्रभारी आणि स्थानिक नेत्यांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर काँग्रेसने ही आकडेवारी मिळवली आहे. काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही एनडीएच सर्वात मोठी आघाडी ठरेल, असा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी एनडीएला 230 जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला असून एनडीएला बहुमतासाठी 40 जागा कमी पडतील, असेही नमूद करण्यात आले आहे. तसेच भाजपालाही 200 पेक्षा कमी जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
काँग्रेसच्या एक्झिट पोलमध्येही यूपीएपेक्षा एनडीए पुढे, भाजपाला दिल्या एवढ्या जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 3:47 PM