Rajnath Singh on NDA Alliance, Narendra Modi PM Post: नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान करण्याचा प्रस्ताव एनडीएच्या बैठकीत मांडण्यात आला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी हा प्रस्ताव मांडला, त्यावर सर्वांनी सहमती दर्शवली. या सभेपूर्वी नरेंद्र मोदींनी संविधानाती प्रत ठेवली असता, त्याला नमन केले. यावेळी मंचावर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू हे मोदींच्या शेजारी बसलेले दिसले. राजनाथ सिंह यांनी पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदींच्या नावाचा प्रस्ताव ठेवला होता आणि अमित शहांनी त्याला अनुमोदन दिले. मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करणे ही केवळ आमची इच्छा नसून देशातील १४० कोटी जनतेची इच्छा आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून बोलले जात आहे की, मोदीजींनी पुढची ५ वर्षे देशाचे नेतृत्व करावे. कारण आमची NDA महायुती ही सक्ती (compulsion) नाही तर वचनबद्धता (commitment) आहे, अशा शब्दांत विरोधकांना राजनाथ सिंह यांनी सुनावले.
राजनाथ सिंह म्हणाले, "आपली सर्वांची ओळख युती धर्माच्या आचरणाने झाली आहे. हा ट्रेंड अटलजींच्या काळापासून सुरू आहे. आमच्यासाठी युती ही 'सक्ती' नसून 'वचनबद्धता' आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी संपूर्ण भारताने पाहिली आहे. एनडीए सरकारने १० वर्षात देशाची सेवा केली, ही आपल्या सर्वांसाठी आनंदाची बाब आहे, केवळ भारतातच नव्हे तर इतर देशांतूनही त्याचे कौतुक होत आहे. तिसऱ्यांदा एनडीएचे सरकार स्थापन होत आहे, हे भाग्य आम्हाला लाभले आहे. १९६२ नंतर पहिल्यांदाच एखादा नेता सलग तिसऱ्यांदा भारताचा पंतप्रधान होणार आहे. आपले भाग्य आहे की आपल्याला मोदींसारखा संवेदनशील पंतप्रधान मिळणार आहे."
या सभेला संबोधित करताना चंद्राबाबू नायडू यांनीही आंध्र प्रदेशात टीडीपीच्या विजयाचे श्रेय भाजपला दिले. ते म्हणाले, "आम्ही एनडीए सरकारसोबत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाने जगाला आपले महत्त्व दाखवून दिले. भारत हे जागतिक महासत्ता बनण्याच्या वाटेवर आहे. देशाच्या विकासाबरोबरच प्रादेशिक आकांक्षाही जपाव्या लागतात. नरेंद्र मोदींच्या रूपाने भारताकडे योग्य वेळी योग्य नेता आहे," असेही नायडू म्हणाले.