लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : लोकसभेत गुरुवारी अर्थसंकल्पावरील चर्चेत सत्ताधारी व विरोधकांमध्ये विविध मुद्द्यांवरून खडाजंगी झाली. त्यामुळे कामकाज दोनदा तहकूब झाले. प्रथम मंत्री रवनीत सिंग बिट्टू आणि काँग्रेस खासदार चरणजीत सिंग चन्नी यांच्यात वादावादी झाली, त्यानंतर सत्ताधारी आणि तृणमूल सदस्यांत बाचाबाची झाली. दरम्यान, खरगेंनी अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्रला पकोडे, जिलेबी दिली असे म्हणताच बिहारच्या मनोज झा यांनी आम्हाला केवळ टरफले दिली असे म्हटले.
एकीकडे पूजा खेडकर तर...
शरद पवार गटाच्या राज्यसभा सदस्य फौजिया खान यांनी यूपीएससीतील दिव्यांग उमेदवारांसमोरील आव्हानांचा मुद्दा उपस्थित करताना चार वेळा यूपीएससी उत्तीर्ण करणाऱ्या दिव्यांग कार्तिक कंसल याला आलेल्या अडचणींचा उल्लेख केला. “एकीकडे आपण पूजा खेडकर पाहतो जी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करते व खोट्या कागदपत्रांच्या आधारे पोस्टिंग मिळवते. दुसरीकडे, आम्ही एक कार्तिक कंसल पाहतो जो चार वेळा यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण होतो आणि तरीही दिव्यांग असल्यामळे सेवा नाकारली जाते,” असे त्या म्हणाल्या.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा द्या : सावंत
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची मागणी शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) अरविंद सावंत यांनी सरकारकडे केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा आणि मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवावा, अशी मागणीही त्यांनी केली. महाराष्ट्रातील कंपन्या गुजरातमध्ये नेल्या जात आहेत, असे झाले तर महाराष्ट्रातील तरुणांना नोकऱ्या कशा मिळणार? असा सवालही त्यांनी केला. कर्मचारी निवड आयोगाच्या निवडप्रक्रियेची चौकशी झाली पाहिजे. कारण निवडलेले बहुतेक लोक फक्त दोन राज्यांचे आहेत, असे ते म्हणाले.
ईस्ट इंडिया कंपनीशी केली तुलना
केंद्र सरकारची ईस्ट इंडिया कंपनीशी तुलना करत चन्नी यांनी आरोप केला की, “त्यांच्यात (सत्ताधारी पक्ष) आणि ब्रिटिश यांच्यात काही फरक नाही, फक्त रंगाचा फरक आहे. आधी ते सत्तेवर आले आणि नंतर सत्तेच्या माध्यमातून ते आपल्या लोकांना देशातील उद्योग ताब्यात घेऊ देत आहेत. रेल्वे राज्यमंत्री आणि काँग्रेसचे माजी सदस्य बिट्टू यांनी टिप्पणी केली. प्रत्युत्तरात चन्नी त्यांचे नाव घेत म्हणाले, “तुमचे वडील शहीद झाले होते. पण मी तुम्हाला सांगतो की, ज्या दिवशी तुम्ही काँग्रेस सोडली त्याच दिवशी खऱ्या अर्थाने त्यांचा मृत्यू झाला होता.”
चन्नी भ्रष्ट नसतील तर मी माझे नाव बदलेन
यावर पीठासीन अध्यक्ष संध्या राय यांनी चन्नी यांना वैयक्तिक प्रतिक्रिया न देण्याचे बजावले. बिट्टू म्हणाले, “त्यांनी (चन्नी) माझे नाव घेतले. माझे आजोबा सरदार बेअंतसिंग यांनी काँग्रेससाठी नव्हे तर देशासाठी बलिदान दिले. चन्नी भाषणात गरिबीबद्दल बोलत आहेत, परंतु जर ते संपूर्ण पंजाबमधील सर्वात श्रीमंत आणि भ्रष्ट व्यक्ती नसतील तर मी माझे नाव बदलेन. चन्नी हे हजारो कोटींचे मालक आहेत आणि त्यांच्यावर ‘मी टू’सह अनेक आरोप आहेत.” यानंतर दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. त्यानंतर सभागृह तहकूब करण्यात आले.
‘जेलचे बजेट वाढवा, पुढचा नंबर तुमचा’
‘जेलचे बजेट वाढवा, पुढचा नंबर तुमचा’ अशी खोचक टीका आपचे संजय सिंह यांनी राज्यसभेत केली. सिंह यांनी गुरुवारी सरकारवर संरक्षण, कृषी, आरोग्य आणि उर्जा यासह तुरुंगाच्या निधीत कपात केल्याचा आरोप केला आणि किमान तुरुंगाच्या बजेटमध्ये वाढ करावी. कारण पुढचा नंबर सत्ताधारी पक्षातील लोकांचा असणार आहे, असे खोचक आवाहन केले.
कर इंग्लंडसारखे, सेवा सोमालियासारख्या : चढ्ढा
गेल्या दहा वर्षांत केंद्र सरकारने कर लादून सर्वसामान्यांचे शोषण केले आहे. येथे, इंग्लंडप्रमाणेच मोठ्या प्रमाणावर कर आकारले जातात, परंतु प्रदान केलेल्या सुविधा सोमालियापेक्षा वाईट आहेत, अशी टीका आम आदमी पक्षाचे खासदार राघव चढ्ढा यांनी राज्यसभेत केली.
शेतकऱ्यांसोबत सुडाची वागणूक
केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर सूडबुद्धीने वागत आहे. शेतकऱ्यांशी संबंधित मोठ्या योजनांची रक्कम पूर्णपणे खर्च केली जात नाही. कारण या वर्गामुळेच आपल्याला सार्वत्रिक निवडणुकीत बहुमत मिळू शकले नाही, असे भाजपला वाटते, असा आरोप काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला यांनी राज्यसभेत केला. शेतकऱ्यांचा आक्रोश, गरिबांची असाहाय्यता, बेरोजगार तरुणांची आरोळी सरकार ऐकते का? असा सवालही त्यांनी केला.
खरगेंच्या टिप्पणीवर झा म्हणाले...
मल्लिकार्जुन खरगे यांनी अर्थसंकल्पात बिहार आणि आंध्र प्रदेशला ‘पकोडे आणि जिलेबी’ देण्यावर टिप्पणी केल्यानंतर, राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) खासदार मनोज झा यांनी गुरुवारी सरकारने प्रत्यक्षात ‘शेंगदाण्याच्या शेंगांच्या नावावर टरफले दिली,’ अशी टीका केली.
बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची गरज
अर्थसंकल्पाला ‘श्रीमंतांचा अर्थसंकल्प’ असे संबोधत राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) संजय कुमार यांनी गेल्या दहा वर्षांत केंद्राच्या दुर्लक्षाचा बळी ठरलेल्या बिहारला विशेष राज्याचा दर्जा देण्याची तत्काळ गरज व्यक्त केली. आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था आहोत. पण, दरडोई उत्पन्नाच्या बाबतीत आपण १९७व्या क्रमांकावर आहोत आणि आमचे स्थान आफ्रिकन देश अंगोलापेक्षाही कमी आहे, असे ते म्हणाले.
अर्थसंकल्प बंगालविरोधी : समीरुल इस्लाम
अर्थसंकल्प जनविरोधी आणि बंगालविरोधी आहे आणि तो केवळ दोन राज्यांवर केंद्रित आहे. सरकार सुरक्षित राहावे हे लक्षात घेऊन तयार करण्यात आला, अशी टीका तृणमूलचे समीरुल इस्लाम यांनी केली.
तृणमूल-राष्ट्रवादीत झाली बाचाबाची
चन्नी यांच्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य सुनील तटकरे यांनी बोलण्यास सुरुवात केली तेव्हा तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी बसण्याच्या जागेबाबत काही आक्षेप घेतला. यानंतर दोन्ही पक्षांच्या सदस्यांमध्ये पुन्हा बाचाबाची झाली. सभागृहातील सदस्यांच्या जागा अद्याप निश्चित झालेल्या नाहीत. या गदारोळात पीठासीन अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी दुपारी २:२५ च्या सुमारास सभागृहाचे कामकाज ३ वाजेपर्यंत तहकूब केले.