Bihar Politics: देशाच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. एकीकडे विरोधकांची एकी होत नाहीये, तर दुसरीकडे भाजपला नवा मित्र मिळाला आहे. हिंदुस्थानी अवाम मोर्चा पक्षाचे संरक्षक आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी (Jitan Ram Manjhi) NDA मध्ये सामील झाले आहेत. आज मांझी आणि त्यांचा मुलगा आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोष कुमार सुमन यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा(Amit Shah) यांची भेट घेतली. या भेटीनंतर संतोषकुमार सुमन यांनी एनडीएमध्ये सामील होण्याची घोषणा केली.
अमित शहा यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीला गृह राज्यमंत्री नित्यानंद राय हेदेखील उपस्थित होते. अमित शहा यांच्या दिल्लीतील निवासस्थानी ही बैठक झाली. यादरम्यान, तिन्ही नेत्यांमध्ये 45 मिनिटे चर्चा झाली. या घोषणेनंतर बिहारमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अलीकडेच जीतनराम मांझी यांनी बिहारमधील महाआघाडी सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यांचा मुलगा संतोष सुमन यांनीदेखील बिहार मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. मिळालेल्या माहितीनुसार, मांझी यांच्यावर त्यांचा पक्ष जेडीयूमध्ये विलीन करण्याचा दबाव होता.
जीतनराम मांझी यांनी महाआघाडीपासून फारकत घेतल्यानंतर नितीशकुमार यांनी त्यांच्यावर मोठे आरोप केले. बिहार सरकारमध्ये मित्रपक्ष असताना जीतन राम मांझी भाजपसाठी हेरगिरी करत असल्याचे नितीश कुमार म्हणाले होते. सोमवारी मांझी यांनी नितीश कुमार सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. यावेळी संतोष सुमन म्हणाले होते की, नितीश कुमार यांचा पक्ष जनता दल युनायटेड (जेडीयू) ने त्यांच्या पक्षावर जेडीयूमध्ये विलीन होण्यासाठी दबाव टाकला होता. भाजपने निमंत्रण दिल्यास एनडीएमध्ये सामील होण्याचा विचार करणार असल्याचे संतोष सुमन यांनी आधीच सांगितले होते.