Vice Presidential Election 2022: देशात सोमवारी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक पार पडली. भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या द्रौपदी मुर्मू आणि विरोधकांचे संयुक्त उमेदवार माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यात ही निवडणूक रंगली. आता ६ ऑगस्टला उपराष्ट्रपती पदासाठी निवडणुक होणार आहे. या निवडणुकीसाठी एनडीए कडून पश्चिम बंगालचे राज्यपाल जगदीप धनखड यांना तर विरोधी पक्षाकडून संयुक्तपणे मार्गारेट अल्वा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याच मुद्द्यावर भाष्य करताना एक तर्काच्या आधारावर भाजपाप्रणित एनडीए ने विरोधी पक्षाच्या उमेदवार मार्गारेट अल्वा यांनाच मतदान केले पाहिजे असे मत राष्ट्रवादीकडून मांडण्यात आले आहे.
सोमवारी झालेल्या निवडणुकीत ९९ टक्के लोकप्रतिनिधींनी आपला मतदानाचा हक्क बजावला. देशातील १० राज्यांत आणि एका केंद्रशासित प्रदेशात १०० टक्के मतदान झाले. राष्ट्रपती पदासाठी ७७१ खासदार आणि ४०२५ आमदारांसह ४७९६ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू यांचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे. तशातच, राष्ट्रवादीचे प्रवक्ते क्लाईड क्रास्टो यांनी ट्वीट करत भाजपाला आवाहन केले आहे. "द्रौपदी मुर्मू यांना NDA ने ज्या विचारसरणीच्या आधारावर राष्ट्रपती पदासाठी पाठिंबा दिला, त्याच विचारांच्या आणि तर्कांच्या आधारावर भाजपाप्रणित NDA ने आता मार्गारेट अल्वा यांना उपराष्ट्रपती पदासाठी पाठिंबा द्यायला हवा. कल्पना करा की देशातील दोन सर्वोच्च पदांवर जर महिला असतील तर भारतासाठी ते खूपच अभिमानास्पद असेल. याचा NDA ने नक्कीच गांभीर्याने विचार करायला हवा", असे ट्वीट करत क्रास्टो यांनी NDA च्या नेतेमंडळींसमोर जणू 'गुगली'च टाकली.
दरम्यान, सोमवारी राष्ट्रपती पदासाठी महाराष्ट्रात मतदान पार पडले. महाराष्ट्रात राष्ट्रपती पदासाठीच्या या निवडणुकीत एकूण २८३ सदस्यांनी मतदानाचा हक्क बजावला. ५ सदस्यांना मात्र विविध कारणांमुळे आपला मतदानाचा हक्क बजावता आला नाही. दिवसभर चाललेल्या या मतदान प्रक्रियेत कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, सत्ताधारी भाजपा आणि विरोधक यांच्याकडून दावे-प्रतिदावे करण्यात आले. भाजपाच्या बबनराव लोणीकरांचा नंबर असतानाही काँग्रेसच्या नितीन राऊतांनी आधी मतदान केल्याने त्यांचे मत बाद करावे अशी मागणी भाजपाकडून करण्यात आली. तसेच, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी भाजपाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मतदान क्रॉस वोटिंग केल्याचा दावाही सत्ताधाऱ्यांकडून करण्यात आला. तर आमच्या आमदारांवर आमचा विश्वास असल्याचे विरोधकांनी सांगितले.