नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपाप्रणित एनडीएची सरकार स्थापनेसाठी हालचाल सुरु झाली आहे. एनडीएची आज दिल्लीत बैठक झाली या बैठकीत सर्वानुमते एनडीएच्या नेतेपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. तसेच 353 खासदारांनी देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींच्या नावाला समर्थन दिलं.
शिरोमणी अकाली दलचे प्रकाश सिंग बादल, एलजेपीचे नेते रामविलास पासवान, शिवसेना नेते उद्धव ठाकरे, जेडीयूचे नेते नितीश कुमार यांच्यासह इतर घटक पक्षाच्या नेत्यांनी नरेंद्र मोदी यांच्या एनडीएचे नेतेपदीच्या प्रस्तावाला पाठिंबा दिला. 353 खासदारांचे समर्थन असणाऱ्या संसदीय दलाचे नेते म्हणून नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा केली तसेच देशाच्या पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावाला समर्थन केले त्याबद्दल भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी सगळ्यांचे आभार मानले तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना अमित शहा यांनी सांगितले की, मागील पाच वर्षात सत्तेच्या काळात सबका साथ, सबका विकास याच धर्तीवर देशातील लोकांची सेवा केली, यंदा लोकांनी मोठ्या प्रमाणात ऐतिहासिक विजय एनडीएला दिला आहे.1971 नंतर देशात पाच वर्ष पूर्ण करुन सलग दुसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे नरेंद्र मोदी दुसरे नेते आहे. जनतेचा कौल मोदींना मिळालेल्या विश्वासाचं प्रतीक आहे. अभूतपूर्व जनतेचा कौल लोकशाहीसाठी मजबूत करणारा आहे असं सांगितले.
तसेच एनडीएच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. 16 वी लोकसभा भंग करण्याबरोबर 17 व्या लोकसभेची स्थापना करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांच्या नेतृत्वात केंद्रीय निवडणूक आयोगाच्या त्रिसदस्यीय समितीने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. या भेटीमध्ये नवनिर्वाचित 542 खासदारांच्या नावाची यादी राष्ट्रपतींना सोपविण्यात आली. 16 व्या लोकसभेचा कार्यकाळ 3 जून पर्यंत संपणार आहे.
शुक्रवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन मंत्रिमंडळाचा सामूहिक राजीनामा सादर केला होता. राष्ट्रपतींनी हा सामूहिक राजीनामा स्वीकारुन 16 वी लोकसभा भंग केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी गुजरातमध्ये त्यांच्या आईला भेटण्यासाठी जाणार आहेत. तर सोमवारी वाराणसी लोकसभा मतदारसंघात जाऊन लोकांचे आभार व्यक्त करणार आहेत.