- संजय शर्मानवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी (दि. ९) सायंकाळी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेऊन दिवंगत जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाची बरोबरी करतील. एनडीएने शुक्रवारी मोदींची एकमताने नेतेपदी निवड केली. त्यानंतर एनडीए नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन सरकार स्थापनेचा दावा केला.
मोदी रविवारी सायंकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी शपथ घेतील. शुक्रवारी संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीत घटकपक्ष आणि भाजपच्या खासदारांनी सर्वसंमतीने मोदींची नेतेपदी निवड केली. केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नरेंद्र मोदींचा एनडीएचे नेते म्हणून प्रस्ताव मांडला. त्याला सर्व घटक पक्षांच्या नेत्यांनी अनुमोदन दिले. नेतेपदी निवड झाल्यानंतर मोदींचे सर्व नेत्यांनी स्वागत केले.
एनडीए संसदीय पक्षाच्या बैठकीनंतर केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्यासह एनडीएचे नेते चंद्राबाबू नायडू, नितीश कुमार यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांनी एनडीएच्या २९३ खासदारांच्या पाठिंब्याचे पत्र राष्ट्रपतींना सुपुर्द करत सरकार स्थापनेचा दावा सादर केला. रविवारी मोदी शपथ घेतील, असे केंद्रीय संसदीय कामकाजमंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितले. मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील मंत्रीही शपथ घेतील, असे ते म्हणाले.
भाजप स्वत:कडे काेणती महत्त्वाची खाती ठेवणार?मोदी यांच्यासह एनडीए सरकारचे तीन ते चार डझन मंत्री ९ जून रोजी शपथ घेऊ शकतात. शिंदेसेना आणि अजित पवार गट यांना प्रत्येकी एक मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. चंद्राबाबू नायडू यांच्या तेलुगू देसम पक्षाने चार मंत्रिपदांची मागणी केली आहे. आत्तापर्यंत भाजपने तीन केंद्रीय मंत्रीपदे देण्याचे मान्य केले आहे. त्यापैकी आयटी, दूरसंचार, ग्रामीण विकास, शहरी विकास आणि अर्थ मंत्रालयाची मागणी पुढे आली आहे. जदयुला ३ कॅबिनेट मंत्रिपदे मिळू शकतात. कृषी, रेल्वे आणि वित्त विभागाची मागणी जदयुकडून आली आहे. सभापतीपदासह गृह, परराष्ट्र, अर्थ आणि संरक्षण मंत्रालये भाजप आपल्याकडे कायम ठेवेल, असा अंदाज आहे.
१८व्या लोकसभेत आहे नवी ऊर्जा : मोदीराष्ट्रपती भवनाबाहेर मोदी यांनी सांगितले की भारताला स्वातंत्र्यप्राप्ती झाली, त्या घटनेला २०४७ साली शंभर वर्षे पूर्ण होणार आहेत. देशाने अनेक स्वप्ने उराशी बाळगली आहेत. त्यांची २०४७पर्यंत पूर्तता व्हावी यासाठी १८वी लोकसभा हा महत्त्वाचा मैलाचा दगड आहे.
मुख्यमंत्री शिंदेंनी दिले कवितेतून अनुमोदनसंसदीय पक्षनेतेपदी नरेंद्र मोदी यांच्या नावाचे अनुमाेदन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक कविता सादर केली.‘मैं उस माटी का वृक्ष नही जिसको नदियों ने सींचा हैबंजर माटी में पलकर मैं मृत्यु से जीवन खींचा हैमैं पत्थर पर लिखी इबारत हूं शीशे से कब तक तोडोगेमिटनेवाला मैं नाम नहीं तुम मुझको कब तक रोकोगे’
प्रादेशिक आकांक्षा आणि राष्ट्रीय हितसंबंधांचा समतोल राखणे आवश्यक आहे. आज भारताकडे योग्य वेळी योग्य नेता आहे, ते म्हणजे नरेंद्र मोदी. भारतासाठी ही खूप चांगली संधी आहे. आता ही संधी गमावली तर कायमचा पश्चाताप होईल. - चंद्राबाबू नायडू, अध्यक्ष, तेलुगू देसम पार्टी
पंतप्रधान मोदी भारताचा मोठ्या प्रमाणावर विकास करतील आणि बिहारकडेही लक्ष देतील. त्यांना आम्ही मनापासून साथ देऊ. मोदींच्या कार्यकाळात आपला पक्ष सदैव भाजपच्या पाठीशी उभा राहील. मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत ही आनंदाची बाब आहे. -नितीशकुमार, जदयु प्रमुख