सगळ्यांना सोबत घेऊनच चाला; 'एनडीए'तील आणखी एका मित्रपक्षाचा भाजपाला इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2018 06:28 PM2018-03-18T18:28:23+5:302018-03-18T18:28:23+5:30
भाजपाने त्यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेचे खऱ्या अर्थाने अनुकरण करण्याची वेळ आली आहे.
पाटणा: आंध्र प्रदेशातील तेलुगू देसम पक्षाने (टीडीपी) राष्ट्रीय लोकशाही आघाडीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर आता आणखी एका मित्रपक्षाने भाजपाला गंभीर इशारा दिला आहे. लोकजनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा रामविलास पासवान यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारमधील पोटनिवडणुकांमधील भाजपाच्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर भाष्य करताना म्हटले की, भाजपाने त्यांच्या 'सबका साथ, सबका विकास' या घोषणेचे खऱ्या अर्थाने अनुकरण करण्याची वेळ आली आहे. त्यासाठी रालोआने समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन पुढे गेले पाहिजे. काँग्रेसने या सर्वसमावेशक राजकारणाच्या बळावरच इतकी दशके भारतात राज्य केले, असे पासवान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
उत्तर प्रदेशातील गोरखपूर आणि फुलपूर लोकसभा मतदारसंघात भाजपाचा झालेला पराभव ही चिंतेची बाब आहे. परंतु, बिहारच्या अररिया मतदारसंघात तस्लिमुद्दीन यांच्याविषयीच्या सहानुभूतीमुळेच 'राजद'चा उमेदवार विजय झाला, असेही पासवान यांनी म्हटले. यावेळी त्यांना चंद्राबाबू नायडू यांच्या 'रालोआ'तून बाहेर पडण्याच्या निर्णयाविषयीही विचारण्यात आले. त्यावर प्रतिक्रिया देताना पासवान यांनी म्हटले की, आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी केंद्राने मान्य केली असती तर हे लोण बिहारपर्यंत पसरले असते. प्रत्येकाला हवे असेल तिथे जाण्याचा हक्क आहे. परंतु, लोकजनशक्ती पक्ष रालोआतच राहील, हे पासवान यांनी स्पष्ट केले.
गेल्या काही दिवसांपासून विशेष राज्याचा दर्जा देण्याची मागणी तेलगू देसम पार्टीतर्फे सातत्याने केली जात होती. मोदी सरकारने ती मान्य न केल्याने त्या पक्षाच्या दोन मंत्र्यांनी आधीच राजीनामा दिला. त्यानंतर आज पक्षाने रालोआतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केला. लोकसभेतील तेलगू देसमचे नेते नरसिम्हम म्हणाले की, आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम असून, त्यासाठी रालोआतून बाहेर पडत असल्याचे टीडीपीने स्पष्ट केले होते.